साताऱ्यात १९ एप्रिलला ‘शिवस्वराज्य रथसोहळा’; पारंपरिक शिवजयंतीनिमित्त शौर्यपरंपरेला देणार उजाळा


 राजधानी साताऱ्यात पारंपरिक शिवजयंतीनिमित्त १९ एप्रिल रोजी भव्य ‘शिवस्वराज्य रथसोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्वराज्यासाठी योगदान देणाऱ्या मावळ्यांचा इतिहास चित्ररथांच्या माध्यमातून उलगडणार आहे.

 स्थैर्य, सातारा, दि. १३ एप्रिल : पारंपरिक शिवजयंतीचे औचित्य साधून राजधानी साताऱ्यात भव्य ‘शिवस्वराज्य रथसोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देणारा हा एक आगळावेगळा उपक्रम ठरणार आहे. या सोहळ्यात स्वराज्यासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मावळ्यांचा आणि विविध ऐतिहासिक घराण्यांचा गौरव चित्ररथांच्या माध्यमातून सादर केला जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विवेकानंद बाबर यांनी दिली.

रथसोहळ्याचे मार्ग आणि नियोजन

येत्या १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून या भव्य रथसोहळ्याची सुरुवात होणार आहे.

  • मार्ग : पोवई नाका ➔ शाहू चौक ➔ कमानी हौद ➔ देवी चौक ➔ गोलबाग ➔ खणआळी ➔ पाचशे एक पाटी ➔ पोलीस मुख्यालय ➔ आणि पुन्हा पोवई नाका येथे या सोहळ्याची सांगता होईल.

चित्ररथांमधून उलगडणार इतिहासाचे जिवंत दर्शन

या रथसोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ९६ कुळी आणि १२ बलुतेदार समाजातील स्वराज्यसेवक तसेच विविध ऐतिहासिक घराण्यांचे योगदान समाजासमोर मांडले जाणार आहे. प्रत्येक घराण्याला स्वतःच्या इतिहासावर आधारित चित्ररथ सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, ज्यामुळे सातारकरांना इतिहासाचे जिवंत दर्शन घडणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने स्वराज्याचे शिलेदार तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, जीवा महाले, शिवा काशीद, महादजी शिंदे, अहिल्याबाई होळकर, बहिर्जी नाईक आदी महापुरुषांच्या पराक्रमाची झलक या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.

सामाजिक सलोखा आणि नव्या पिढीला प्रेरणा

या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ इतिहास सांगणे हा नसून, समाजातील सर्व घटकांमध्ये सामाजिक सलोखा वाढवणे आणि स्वराज्याच्या शौर्यपरंपरेची नव्या पिढीला योग्य ओळख करून देणे हा आहे. इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा रथसोहळा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, सर्व समाजघटकांनी यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक विवेकानंद बाबर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!