कर्तृत्ववान महिलांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक : मंत्री शिवेंद्रराजे भोसले; साताऱ्यात महिला सन्मान व आरोग्य शिबिर उत्साहात


 शेंद्रे (ता. सातारा) येथे राज्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर, ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम आणि महिला सन्मान सोहळा हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला.

 स्थैर्य, सातारा, दि. ६ एप्रिल : “आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. चूल-मूल, संसार याबरोबरच स्त्री नोकरी, व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे, ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. प्रत्येक महिलेने सक्षम झाले पाहिजे. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचे समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असून, त्यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे,” असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

शेंद्रे (ता. सातारा) येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने सातारा तालुक्यातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, ‘होम मिनिस्टर’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. हजारो महिलांच्या उपस्थितीत हा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

१५०० हून अधिक महिलांची आरोग्य तपासणी

या महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा सुमारे १५०० महिलांनी लाभ घेतला. या शिबिरात स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, दंतरोग, त्वचारोग, नेत्र तपासणी आणि असंसर्गजन्य रोग आदी विविध आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे याप्रसंगी अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानही केले.

यावेळी डॉ. स्नेहांजली महामुनी, डॉ. आशा बर्गे, डॉ. दीप्ती पवार, डॉ. अश्विनी सोनवलकर, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. रसिका गोखले, डॉ. राजश्री ठोके आणि डॉ. अपर्णा जगताप आदी वैद्यकीय तज्ज्ञांनी विविध आजार आणि त्यावरील उपचारांबाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले.

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने जिंकली मने

या शिबिर आणि सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या हजारो महिलांच्या मनोरंजनासाठी अभिनेते ओम यादव यांचा ‘होम मिनिस्टर’ हा खेळ रंगला. या कार्यक्रमाने उपस्थित महिलांची मने जिंकली. या कार्यक्रमातील विजेत्या तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान माता-भगिनींचा ना. शिवेंद्रसिंहराजे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य अजित साळुंखे, सर्जेराव सावंत, पूजा मोरे, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे, उपसभापती सुषमा जाधव, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, डॉ. दीपक थोरात, सातारा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. विनायक काळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

(छायाचित्र : कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करताना ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व उपस्थित मान्यवर)


Back to top button
Don`t copy text!