स्थैर्य, दि.१०: शिवछत्रपती पुरस्कार विजेते जेष्ठ संघटक नथुराम पाटील यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी रत्नप्रभा, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. त्यातून ते सावरू शकले नाहीत. बुधवारी त्यांचे निधन झाले. रायगड जिल्हा कबड्डी संघटनेच्या स्थापनेपासून ते त्या संघटनेचे प्रमुख कार्यवाह म्हणून नथुराम पाटील कार्यरत होते. जवळपास चार दशके त्यांनी या पदावर काम केले. रायगडच्या कबड्डीला प्रगतीपथावर नेण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत त्यांनी उपाध्यक्ष, पंच समिती अध्यक्ष, महाराष्ट्र पुरुष संघाचे व्यवस्थापक या पदांवर काम केले. त्यांनी खो-खो, कॅरम, कुस्ती, अॅथलेटिक्स या खेळांच्या संघटनेवरही पदाधिकारी म्हणून काम केले होते. त्यांच्या या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना २००६-०७ मध्ये संघटक म्हणून ‘शिवछत्रपती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले होते.
‘रायगडच्या कबड्डीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे आणि आम्हा सर्वांना योग्य मार्गदर्शन करणारे संघटक हरपले,’ अशा शब्दांत रायगड जिल्हा व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव आस्वाद पाटील यांनी नथुराम पाटील यांना आदरांजली वाहिली. बुधवारी दुपारी पेझारी, अलिबाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.