दैनिक स्थैर्य । दि. ०६ मार्च २०२२ । फलटण । फलटण तालुक्यात होणा-या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती आदी आगामी येणा-या सर्व निवडणूका युतीमध्ये लढण्यावर मजबूत शिक्कामोर्तब करण्यात आले. दोन्ही पक्षाकडुन फलटण तालुक्यासाठी चार सदस्यीय एक कोअर कमिटी देखील नेमण्यात आली आहे. फलटण तालुक्यात नागरिकांना आश्वासक वाटेल असा पर्याय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व वंचित आघाडी देणार असल्याचे सर्व प्रमुख पदाधिका-यांनी स्पष्ट केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकशाही व संविधान संरक्षण, तसेच विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येत महाराष्ट्रात शिवसेना व वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील शिवसेना व वंचित आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी यांची एकत्रित बैठक आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही पक्षांची संयुक्तिक बैठक आज रविवारी शासकीय विश्रामगृह फलटण येथे संपन्न झाली. विविध सामाजिक, सार्वजनिक, शहरी व ग्रामीण अशा सर्वच भागातील नागरिकांच्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. सर्व पदाधिकारी यांनी यावेळी आपापली मते व्यक्त केली.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे व विकास नाळे, शहरप्रमुख निखिल पवार, महिला आघाडीच्या सुशिला जाधव, उपतालुका प्रमुख नानासाहेब भोईटे, ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी जिल्हा प्रमुख शैलेश नलवडे, विभाग प्रमुख किसन यादव, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, मलठण शाखाप्रमुख अक्षय तावरे हे उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सातारा पुर्व जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, फलटण तालुका अध्यक्ष संदीप काकडे, महासचिव अरविंद आढाव, शहराध्यक्ष उमेश कांबळे, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर विद्वत सभा सातारा जिल्हाध्यक्ष अशोक भोसले, माजी नगरसेवक व ओबीसी फलटण तालुका संघटनेचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड, सचिव अजित कांबळे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा अश्विनी अहिवळे, महिला आघाडी शहर अध्यक्षा सपना भोसले, शहर उपाध्यक्ष किरण अहिवळे, मुंजवडी शाखा अध्यक्ष अनिल रणदिवे हे उपस्थित होते.