स्थैर्य,पुणे, दि.२०: शिवेसना नेते संजय राऊत यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठ विधान केले आहे. भाजपा विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, या बद्दल त्यांनी आज सूतोवाच केले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र महापालिका निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे. ते पुण्यात बोलत होते.
संजय राऊत पुण्यात महापलिका निवडणुकांविषयी बोलताना म्हणाले की, ‘आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणात आहेत. यामध्ये काँग्रेसला कसे सामावून घेता येईल, त्या बद्दल चर्चा करु’ राऊत म्हणाले. राऊत यांनी शनिवारी शहर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
ज्यांची ताकद जास्त त्यांनी नेतृत्त्व करावे
महापालिकेमध्ये जास्त ताकद असलेल्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी स्थापन करावी. त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात येईल. असे सूत्र ठरले असल्याची माहिती राऊतांनी दिले. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद या महापालिकेत शिवसेनेची ताकद जास्त आहे. तर, पिंपरी-चिंचवड अशा काही महापालिकांत राष्ट्रवादीची निश्चितच ताकद जास्त आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, येत्या काळात निवडणुका एकत्र लढविण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यासोतबच इतर महत्वाच्या नेत्यांशी चर्चा करू. एकत्र निवडणूक लढली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. सत्ता काबीज करण्यासाठी एकत्र लढल्यास मदत होईल. असेही राऊत म्हणाले.