स्थैर्य, मुंबई, दि.५: ‘शिवसेना म्हणजे नौटंकी सेना आहे’, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, शिवसेनेने आता औरंगाबादचे संभाजीनगर करा, असे म्हणायचे. म्हणजे त्यांना वाटते मतदार खूश होतील. काँग्रेसने ते करू नका असे म्हणायचे, म्हणजे त्यांना वाटते त्यांचे मतदार खूश होती. निवडणुका आल्यामुळे नूराकुस्ती आता सुरू झाली आहे. दोघांनाही या बाबतीत कुठलेच गांभीर्य नाही. नामांतराचा विषय म्हणजे सेनेचे नाटक आहे, सेना फक्त प्रस्ताव पाठवते भूमिका काय घेत नाही, ही सगळी नाटक कंपनी आहे, असे टीकास्त्र फडणवीसांनी शिवसेनेवर सोडले.
फडणवीस पुढे म्हणाले की, औरंगाबादच्या नामांतर भाजपने 1995 पासून चार प्रस्ताव औरंगाबाद पालिकेत दिले होते. पण शिवसेनेने त्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा शिवसेनेने कच खाल्ली. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा औरंगाबादला रस्त्याला पैसे दिले. पण महानगरपालिकेने ते पैसे वेळेत खर्च केले नाहीत. औरंगाबादमध्ये इतकी वर्षं सत्ता चालवूनही कुठलेही महत्त्वाचे काम न करता आल्याने अशा प्रकारची भाषा चाललेली आहे. निवडणुका आल्यानंतर या गोष्टी का आठवतात, असा सवालही फडणवीसांनी विचारला.