स्थैर्य, सातारा, दि.१९: येथील राजवाडा बस स्थानकात उभारण्यात आलेल्या शिल्पसृष्टीवरून वाद निर्माण होत चालला आहेत. हे वाद निर्माण होत असतानाच शिल्पसृष्टीच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मैदानात उतरली आहे. याबाबतचे निवेदन प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवक विजय काटवटे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले. निवेदनासोबत पुराव्यादाखल महाराष्ट्र राज्य गॅझेटियरच्या “सातारा जिल्हा’ या खंडातील पानांच्या प्रती जोडण्यात आल्या आहेत.
हिंदुत्वनिष्ठ संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर, पक्ष आणि संप्रदायाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. या वेळी शहाजीबुवा रामदासी, नगरसेवक प्राची शहाणे, प्रकाश शहाणे, शुभम शिंदे, ऋषिकेश कणसे, चंदन डोंगरे, तेजस ढाणे, अजिंक्य गुजर, तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि धारकरी उपस्थित होते. निवेदनातील माहिती अशी, सातारा ही ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीस छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींचा पदस्पर्श झाला आहे. या ऐतिहासिक भूमीतील राजवाडा बस स्थानकात शासनाच्या वतीने “शिवसमर्थ’चे शिल्प उभारण्यात आले आहे. हे शिल्प गुरू-शिष्य परंपरेची महती सांगणारे आहे.
संपूर्ण जगात, देशात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे नाव आदराने गुरुशिष्य परंपरेत घेतले जाते. याबाबतचे ऐतिहासिक दस्तऐवज पुरातत्व खात्याकडे, तसेच धुळे येथील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध आहेत. या पुराव्यांकडे दुर्लक्ष करत पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांनी विनाकारण शिल्पावर आक्षेप घेतला आहे, तसेच काही जण शिल्प हटविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणत असून, त्या प्रवृत्तींचा निषेध करत आहेत. निवेदन देण्यापूर्वी शहाजीबुवा रामदासी व इतरांनी समर्थनाच्या बाबतीतील भूमिका मांडली. नगरसेवक काटवटे यांनीही हा वाद चुकीचा असून, शिल्पाच्या बाजूने शिवप्रेमी, धर्मप्रेमींनी समर्थन दिल्याचे सांगत शंका असणाऱ्यांनी पुराव्यानिशी चर्चेला येण्याचे आव्हान दिले.