दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । मालेगाव । सेवाभावी उपक्रमातून शिवभोजन केंद्राने राज्यातील गरीब जनतेला दिलासा देण्याचे चांगले काम उभे राहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला दिलासा मिळत आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. या पुण्याच्या कार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना शुभेच्छा देत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी त्यांचे आभार मानले.
रावळगाव नाका, कॅम्प परिसरातील सोमवार बाजारातील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, राजाराम जाधव, नगरसेवक भिमा भडांगे, राजेश गंगावने, संजय दुसाणे, रामा मिस्तरी, किरण छाजेड, पिंटू कर्नावट, दिपक मेहता, हरी निकम, विशाल पाटील, प्रमोद पाटील, चैत्राम पवार, दिपक भोसले आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, निर्धारित थाळ्यांपेक्षा अधिकांना लाभ देवून पुण्याचे काम शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून घडत आहे. गोर गरिबांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत लाभ शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून देण्यात येतो. गुरुराम शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या या शिवभोजन केंद्रामार्फत शासनाने 100 थाळ्या निर्धारित केल्या असल्यातरी, या केंद्रावर दरदिवसाला 200 ते 250 थाळ्यांचे वितरण करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. या माध्यमातून एकही नागरिक उपाशी राहणार नाही असे नियोजन केल्यामुळे ते निश्चितच कौतुकास पात्र असल्याचेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी नमूद केले.
कोरोनाच्या संकट काळात जय आनंद ग्रुपने शहरातील सहा रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांना सकस आहाराचा नास्ता या संस्थेने जवळपास 75 दिवस मोफत पुरवून आपल्या सेवाभावी उपक्रमाची पावती दिल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, कुठलेही व्यावसायिक तत्व न बाळगता मोसम पुलावरील शिवभोजन केंद्रामार्फतही कोरोनाच्या काळात गोरगरीबांच्या वस्त्यांमध्ये घरोघरी जावून शिवभोजन पुरविणारी टिम नक्कीच कौतुकास पात्र आहे. कॅम्प परिसरात येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना या शिवभोजन केंद्राचा नक्कीच आधार मिळेल असा विश्वासही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंगसे बाजार समिती मार्फतही येणाऱ्या शेतकऱ्यांना अवघ्या दहा रुपयात पोटभर जेवण देण्याचे काम अविरतपणे सुरू असून या सेवाभावी उपक्रमास सहयोग देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मंत्री श्री.भुसे यांनी आभार मानले.