रणरणत्या उन्हात अवजड कावडी खांद्यावर घेत ‘हर हर महादेव’च्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत शिवभक्तांनी शिखर शिंगणापूर येथील अवघड मुंगी घाट सर करत कावड यात्रेची सांगता केली. पंचनद्यांच्या पाण्याने महादेवाला जलाभिषेक करण्यात आला.
स्थैर्य, फलटण, दि. ३१ मार्च : रणरणत्या उन्हात अवजड कावडी खांद्यावर घेत आणि ‘म्हाद्या धाव… म्हाद्या पाव… हर हर महादेव!’ असा गगनभेदी जयघोष करत शिवभक्तांनी शिखर शिंगणापूर येथील अत्यंत अवघड मानला जाणारा ‘मुंगी घाट’ सर केला. कावडीतून आणलेल्या पवित्र जलाच्या शंभू महादेवाच्या वरील जलाभिषेकाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला असून, या चित्तथरारक कावड यात्रेची अत्यंत उत्साहात सांगता झाली.
सह्याद्रीच्या महादेव डोंगररांगेतील हा अत्यंत उंच आणि खड्या चढणीचा मुंगी घाट सर करण्याचा थरार डोळ्यांत साठवण्यासाठी लाखो भाविकांनी डोंगररांगांवर मोठी गर्दी केली होती.
असा पार पडला मुंगी घाटातील थरार:
शिखर शिंगणापूर येथील महादेवाची कावड यात्रा गुढी उभारून सुरू झाली होती. हळदीचे कार्यक्रम पार पडल्यानंतर ध्वज बांधण्यात आले. एकादशी दिवशी इंदूर येथील काळगावडे राजे यांनी शिव-पार्वतीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मुंगी घाटातून कावडी चढवण्यास सुरुवात झाली.
दुपारच्या रणरणत्या उन्हातही शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कड्याकपारीत पाय रोवत, एकमेकांची मानवी साखळी तयार करत आणि भक्कम दोरखंडाच्या साहाय्याने या अवजड कावडी मुंगी घाटातून शिताफीने वर चढवण्यात आल्या. ढोल-ताशे, सनई आणि हलगीच्या कडकडाटात भक्त तल्लीन होऊन नाचत होते. सायंकाळी उशिरापर्यंत ‘हर हर महादेव’च्या जयघोषात हा थरार सुरू होता. अखेर रात्री उशिरा सर्व मानाच्या कावडी मुंगी घाट सर करून शंभू महादेवाच्या मंदिरात दाखल झाल्या.
‘तेल्याभुत्याची कावड’ ठरली यात्रेचे खास आकर्षण!
खळद, एकतपूर, शिवरी, बेलसर, सासवड, मावळ आदी भागांतून मोठ्या प्रमाणात कावडी शिंगणापूरमध्ये दाखल झाल्या होत्या. यामध्ये शिखर शिंगणापूर यात्रेत विशेष मानाचे स्थान असलेली ‘संत तेली भुतोजी बुवा’ (तेल्याभुत्याची कावड) यांची कावड ही यंदाही यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरली. तसेच निवृत्ती महाराज खळदकर आणि काशीनाथ कावडे यांच्या मानाच्या कावडींनीही भाविकांचे लक्ष वेधून घेतले. मुंगी घाटातील त्यांच्या कावडीचा थरार पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
पंचनद्यांच्या पाण्याने महादेवाला जलाभिषेक:
मुंगी घाट सर करून कावडी मंदिरात पोहोचल्यानंतर निरा नदीसह पंचनद्यांच्या पवित्र पाण्याने शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात आला. मानाच्या कावडींचे मान्यवरांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले. या कावडींनी शंभू महादेवाची भेट घेतल्यानंतर यात्रेची अधिकृत सांगता झाली.
उत्तम नियोजनामुळे यात्रा सुरळीत:
लाखो भाविकांची गर्दी आणि मुंगी घाटातील अवघड मार्ग लक्षात घेता, पोलीस प्रशासन, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने वाहतूक व सुरक्षेचे अत्यंत अचूक नियोजन केले होते. यामुळे ही मोठी यात्रा सुरळीत पार पडली.
यावेळी प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलीस बंदोबस्तातील अधिकारी-कर्मचारी, माण पंचायत समिती सदस्य राजाराम बोराटे, प्रशासक कावेरी खंदारे आदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
