शिंदेनगरमध्ये सशस्त्र दरोडा आणि तरुणीचे अपहरण; लव्ह जिहादच्या चर्चेने खळबळ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

शिंदेनगर (आसू) येथे चार संशयितांनी पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून घरातील ऐवज लुटला आणि २३ वर्षीय तरुणीचे अपहरण केले. या घटनेमुळे तालुक्यात लव्ह जिहादची चर्चा सुरू असून मोठी खळबळ उडाली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०५ ऑक्टोबर : शिंदेनगर (आसू, ता. फलटण) येथे रात्रीच्या सुमारास चार संशयितांनी घरात घुसून पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवत रोख रक्कम व दागिन्यांची लूट केली. तसेच एका २३ वर्षीय तरुणीचे बळजबरीने अपहरण केले. या खळबळजनक घटनेनंतर फलटण तालुक्यात हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे असल्याची मोठी चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिस्तुलाचा धाक आणि लूट

फिर्यादी हे कुटुंबासह घरात असताना चार तरुण अचानक घरात घुसले. संशयित शहाबाज शेख याने फिर्यादीच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यांना मारहाण केली. त्यानंतर कपाटातील २० हजार रुपये रोख आणि गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र काढून घेतले. समीर आतार, सद्दाम शेख आणि अमीर पठाण या इतर संशयितांनी हातातील कोयत्याचा धाक दाखवून घरातील महिलांना व सदस्यांना मारहाण करत दहशत माजवली.

बळजबरीने तरुणीचे अपहरण

घरातील ऐवज लुटल्यानंतर संशयितांनी घरातील २३ वर्षीय तरुणीचे तोंड मनाविरुद्ध बळजबरीने बांधले. चौघांनी तिला उचलून घराबाहेर ओढत नेले आणि पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीत टाकून तिचे अपहरण केले. पोलिसांत तक्रार दिल्यास मुलीला मारून टाकू, अशी गंभीर धमकीही संशयितांनी जाताना दिली. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची पद्धत पाहता हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

चार संशयितांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी शहाबाज अन्वर शेख, समीर आतार, सद्दाम शमसुद्दीन शेख (सर्व रा. बारामती, जि. पुणे) आणि अमीर रेहमान पठाण या चार संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!