चित्रपटगृहात जाऊन मारहाण करणे शिंदे फडणवीसांच्या राज्यात सहन करणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । एखाद्या चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करता येईल किंवा शांततामय पद्धतीने विरोधही करता येईल. पण चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्याची दादागिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कोणीही सहन करणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला.

मा. बावनकुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात आहेत. कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, भाजपा कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे व विभागीय संघटनमंत्री मकरंद देशपांडे उपस्थित होते.

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केल्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता मा. बावनकुळे म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. एखाद्या चित्रपटात काही आक्षेपार्ह असेल तर त्याच्या विरोधात सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार करावी. विरोध करण्यासाठी शांततामय मार्गाने धरणे देता येते, निदर्शने करता येतात किंवा उपोषण करता येते. पण सीसीटीव्ही चित्रिकरण चालू असूनही थिएटरमध्ये जाऊन कोणी लोकांना मारहाण करेल आणि महिलांचा अपमान करेल तर दादागिरी खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात हे कोणीही सहन करणार नाही.

ते म्हणाले की, काँग्रेस पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, त्यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची यात्रा राज्यात आली आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. काँग्रेसच्या बाराशे कार्यकर्त्यांनी काल सातारा येथे भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या आठवड्यात नंदूरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे तीन नगरसेवक भाजपामध्ये दाखल झाले. राहुल गांधी यांची यात्रा काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या मुलांनी ताब्यात घेतली आहे. काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना यात्रेचा गंधही नाही.

त्यांनी सांगितले की, शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. किर्तीकरांसारखा शिवसेनेसाठी आयुष्य देणारा कार्यकर्ता सोडून जातो व अशा रितीने शिवसेनेच्या मूळ विचारांचे सर्वजण सोडून गेले तरी मा. उद्धव ठाकरे यांना काही फरक पडत नाही. कारण त्यांच्या पाठीशी आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे.

ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मध्य प्रदेशला मिळाला आहे, त्याविषयी एका पत्रकाराने विचारले असता मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, याबाबतीत गैरसमज पसरवू नये. हा प्रकल्प मिळण्यासाठी जून महिन्यात केंद्र सरकारला एक निर्दोष प्रस्ताव सादर करायचा होता, पण त्यावेळी सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीने ते काम केले नाही, त्यामुळे हा प्रकल्प गमावण्यासही महाविकास आघाडीच दोषी आहे. त्याबद्दल शिंदे फडणवीस सरकारला दोष देता येणार नाही.

ते म्हणाले की, लव्ह जिहादमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करून हिंदू मुलींना फसविले जाते. त्यामुळे हा प्रकार थांबायला हवा, अशी भाजपाचे ठाम मत आहे. लव्ह जिहादचे कोणतेही प्रकरण असेल तर तेथे भाजपा कठोर भूमिका घेईल.


Back to top button
Don`t copy text!