दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२१ । फलटण । शरयु अॅग्रो इंडस्ट्रीज लि; या साखर कारखान्याने सन 2020 – 21 या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकर्यांचे ऊसबिल व्याजासह तात्काळ न दिल्यास येत्या 15 ऑक्टोबर रोजी दसर्याच्या शुभमूहुर्तावर कारखान्यावर सर्व शेतकर्यांना बरोबर घेवून शिमगा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शरयु कारखाना व्यवस्थापनाला दिला आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शरयु कारखान्यास गेल्या गळीत हंगामात शेतकर्यांनी पुरवठा केलेल्या ऊसाचे बिल अदा केले नसल्याच्या अनेक तोंडी व लेखी तक्रारी विशेष करून सातारा, कोरेगाव, वाई, व इतर ठिकाणाहून प्राप्त झाल्या आहेत. कारखाना अनेक शेतकर्यांना उशीरा, अपुर्ण बील देऊन ऊस नियंत्रण कायदा 1966 च्या अध्यादेशाचा वारंवार भंग करत असल्याचे दिसून आले आहे. शेतकरी अगोदर अनेक संकटाना तोंड देत पिक व इतर कर्ज काढून शेतमाल पिकवतो व कारखान्याने कायदा न पाळता ऊसबिल न दिल्याने शेतकरी चुक नसताना नाहक मनस्ताप व आर्थिक संकटात व्याजाच्या व कर्जाच्या बोझाखाली दबतो आहे.
त्यामुळे येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत जर शरयु कारखान्याने शेतकर्यांचे थकीत ऊसबिल व्याजासह न दिल्यास कारखान्यावर सर्व शेतकर्यांना घेऊन दि. 15 ऑक्टोबर ला विजयादशमी – दसरा या सणाला शिमगा आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजु शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जूनभाऊ साळुंखे, जिल्हाध्यक्ष सातारा पूर्व विभाग धनंजय महामूलकर, फलटण तालुका अध्यक्ष नितीन यादव, सातारा तालुका अध्यक्ष जीवन शिर्के, कोरेगाव तालुका अध्यक्ष मनोहर येवले, सातारा जिल्हा संघटक मोनहर येवले, उपाध्यक्ष संजय जाधत्त, फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर, निखील नाळे, रमेश पिसाळ उपस्थित होते.