मंडल आयोगावेळीच मराठा समाजाचा विचार का झाला नाही मराठा महासंघाचे शशिकांत पवार यांचा सवाल 


 

स्थैर्य, सातारा, दि.१: मंडल आयोगाच्या शिफारशींना मान्यता दिली त्यावेळी त्यामध्ये मराठा समाजाचा का विचार झाला नाही. त्यातून मराठा समाजला का बाजूला केले, असा प्रश्‍न आजही मला आहे. त्यावर शरद पवार का बोलत नाहीत, असा सवाल करतच मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी मराठा आरक्षणाचा विचार मंडल आयोगावेळी झाला असता तर आज ही परस्थितिी आली नसती, असेही सातारा येथे एका पत्रकार परिषदेत नमूद केले.

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने गेले काही दिवस सतत चर्चा सुरू झाल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले होते. मराठा महासंघाचे शशिकांत पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मंडल आयोगाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार यांच्या विरोधात भूमिका मांडली. सातारा येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते.

आपला मुख्य विषय मराठा आरक्षणाचा असून गेली अनेक वर्षे मराठा आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. ज्यावेळी मंडल आयोग आला त्यावेळी नेमके काय झाले, काय घडले याची उत्सुकता सर्वांना आहे. त्यावेळी मराठा महासंघाचे शशिकांत पवार यांनी नेमकी काय भूमिका मांडली होती, त्याची माहिती पवार देणार आहेत, असे उदयनराजेंनी सांगताच शशिकांत पवार यांनी भूमिका मांडली.

शशिकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला तसेच मंडल आयोगावेळी त्यांनी मराठा समाजाचा विचार का केला नाही..?, असा सवाल करून ते म्हणाले, ’आम्ही एकत्र राहणारी माणसे आहोत. मराठा समाजाच्या काही अडचणी आहेत. मात्र त्या सोडवण्यिासाठी शरद पवार यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून काहीच झाले नाही. याबाबत तर ते आता काहीच बोलत नाहीत. मराठा समाज एकत्र आला तर सर्व समाज एकत्र येतात ही वस्तुस्थिती आहे. मराठा आरक्षणावर शरद पवार का बोलत नाहीत, हे त्यांनाच माहित असेल. त्यांच्या भूमिकेमुळे मराठा समाज दूर झाला आहे.

शशिकांत पवार म्हणाले, मराठा समाजाचे अनेक प्रश्‍न असताना मी आण्णासाहेब पाटील यांच्याबरोबर काम सुरू केले. त्यावेळी मंडल आयोग नव्हता. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही त्यावेळी पुढे केली होती. नेमका याच वेळी मंडल आयोग आला. तो आल्यानंतर आम्ही जे काही सांगितले तो भाग बाजूला केला. वसंतरावदादा पाटील यांनी आम्हाला मदत केली आणि शरद पवारांनी विरोध केला. दरम्यान, तुम्ही नेमके काय सांगितले आणि शरद पवार यांनी नेमका काय विरोध केला असा प्रतप्रिश्‍न शशिकांत पवार यांना केला असता मला आता ते काही आठवत नसल्याचे सांगत या विषयाला पूर्णतः बगल दिली.

सातारा येथील पत्रकार परिषदेत शशिकांत पवार यांना विचारण्यात आलेल्या काही प्रश्‍नांना त्यांनी बगल दिली. मंडल आयोगावर तुम्ही भूमिका काय मांडली आणि शरद पवार त्यावर काय बोलले, यावर त्यांनी फार काही बोलण्यास नकार दिला. मी जे काही सांगितले त्याचा पवारांनी उलटा अर्थ लावला, एवढेच त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शरद पवार यांनी जाणीवपूर्वक हे केले आहे असे वाटते का..? आणि तसे केले असेल तर त्यांनी तसे का केले..?, असे विचारले तर मला सांगता येणार नाही असे नमूद केले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी शरद पवारांना समवेत घेतले तर काय होऊ शकते, असे विचारले तर काय होईल हे सांगता येत नसल्याचे सांगत पत्रकार परिषद आटोपती घेतली.

उदयनराजेंचा पराभव जव्हिारी..!

सातारा येथील पत्रकार परिषदेत शशिकांत पवार यांच्या शेजारी उदयनराजे भोसले बसले होते. पवार आपली भूमिका मांडत असताना मध्येच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या तत्कालीन पोटनिवडणुकीत उदयनराजे यांच्या पराभवाविषयी बोलले. उदयनराजे यांच्याकडे पाहतच ते म्हणाले, तुमचा पराभव झाला. ही बातमी माझ्या कानावर पडली, त्यावेळी मी घरी होतो. मी खूप अस्वस्थ झालो. माझे डोळे पाण्याने भरले. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाचा पराभव केला होता. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे आम्ही मराठा समाज एकत्र करतो आहे. हेवे-दावे विसरा आणि एकत्र या. आपण जर एकत्र नाही आलो आणि आरक्षण नाही मिळवले तर मेलेले बरे, अशी स्पष्टोक्ती पवार यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!