दैनिक स्थैर्य । दि. ०७ एप्रिल २०२३ । अहमदनगर । अहमदनगर – माझ्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे यांना जितकं स्थान आहे तितकेच शरद पवार आहेत. बाळासाहेबांनी मला उभे केले परंतु पवारांनी मला नेहमीच आधारस्तंभ दिला. पवारांना काळोखात भेटणे, हायवेवर भेटणे असं होत नाही. निकाल पूर्ण लागलेही नव्हते तेव्हा शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली. मी तिथून थेट शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकला गेलो. सरकार बनवण्यासाठी आलोय असं म्हटलं. लपवले कुठे? आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत हे उद्धव ठाकरेंनी सांगितले. हा संदेश स्पष्ट होता असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
अहमदनगर येथे एका कार्यक्रमात खा. संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही भाजपासोबत निवडणूक लढवली हे खरे आहे. पण निवडणूक लढवण्याआधीही आमचा काडीमोड २०१४ साली झाला होता. आम्ही एकत्र लढलो नाही. युती भाजपाने तोडली होती. देशभरात घोडा उधळला होता. त्यामुळे स्वबळावर आम्ही देश काबीज करू असं भाजपाला वाटले. जागावाटपात अडचणी निर्माण केल्या. जे शक्य नव्हते. १-२ जागांवर युती तोडली. पुन्हा २-३ महिन्यात आम्ही एकत्र आलो असं त्यांनी सांगितले.
त्यानंतर जेव्हा लोकसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा अमित शाह मातोश्रीवर आले. चर्चा झाली. पुन्हा एकत्र येण्याचं ठरले. ज्या काही गोष्टी ठरल्या त्यात समसमान वाटप ठरले होते. पत्रकार परिषदेत जाहीर झाले. निकाल लागल्यानंतर भाजपाने तो फॉर्म्युला नाकारला. कारण त्यांना जास्त जागा मिळाल्या होत्या आणि आमच्या काही जागा त्यांनी पाडल्या होत्या असा आरोप संजय राऊतांनी केला.
मोदी-शाह यांच्याकडून लोकशाही खड्ड्यात घालण्याचं काम
आत्ताची पत्रकारिता लोकशाहीला पुरक नाही. पत्रकार निर्भय असतील बेडर समाज निर्माण होते. लोक रस्त्यावर उतरायला घाबरतात. इजिप्त, सिरियाला काय झाले? पत्रकारांनी लोकांना ताकद दिल्यानंतर समाज रस्त्यावर उतरला. देशात लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही व्यापारी आहोत असं खुले सांगतात. लोकशाहीचे प्रत्येक स्तंभ विकत घेतले आहेत. प्रत्येक गोष्टींवर त्यांचा मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. भांडवलदारांच्या हाती लोकशाही चालली आहे. तपास यंत्रणाचे प्रमुख, न्यायाधीश, अधिकारी कोण असावेत हे ते ठरवतात. १४० कोटी जनता असलेल्या भारतातील लोकशाहीला खड्ड्यात घालण्याचं काम मोदी-शाह करतायेत असा आरोप राऊतांनी केला.