दैनिक स्थैर्य | दि. 23 जुन 2024 | पुणे | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष विधानसभेची तयारी करत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे पुणे येथे सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. यामध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश असून नक्की फलटण विधानसभा मतदारसंघाबाबत शरद पवार काय निर्णय घेणार? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
गतकाही वर्षांपूर्वी राज्यामध्ये झालेल्या राजकीय नाट्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महायुतीच्या सोबतच श्रीमंत रामराजे हे राहिले होते. अगदी लोकसभा निवडणुकी पूर्वी व नंतर सुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेल्या बैठकीला श्रीमंत रामराजे यांची उपस्थिती होती.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाने फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता.
या सर्व बाबींचा विचार करता फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष नक्की कोणाला उमेदवारी देणार? की पुन्हा श्रीमंत रामराजे हे अजितदादांची साथ सोडून शरद पवार यांच्यासोबत येणार? याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.