जिल्हा बँकेचा तिढा शरद पवार सोडविणार; सर्वपक्षीय पॅनेल होणार अंतिम ?


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | सातारा | जिल्ह्यातील सहकाराची अर्थवाहिनी असणाऱ्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचा राजकीय तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादी सुप्रीमो खासदार शरद पवार हे रविवारी दि. 31 रोजी साताऱ्यात येणार आहेत. खासदार पवारांच्या याच दौऱ्यात राष्ट्रवादीचे सर्वसमावेशक पॅनेल अंतिम होणार असून आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांची रणनीती ठरणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद पवार यांच्या या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादी अंर्तगत तगड्या उमेदवारांची नावे आमने सामने आल्याने राष्ट्रवादी पुढे पेच वाढला आहे. कराडच्या सोसायटी मतदारसंघात पालकमंत्री बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेत. पालकमंत्र्यांनी सोसायटी मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला तरी पारंपारिक मतदार संघ न सोडण्याचा उदयसिंह पाटील यांचा हट्ट कायम आहे. खटाव सोसायटीतून प्राबल्य असताना प्रभाकर घार्गे व त्यांच्या पत्नी इंदिरा यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी नेत्यांनी केलेला विरोध घार्गे समर्थकांना पचनी पडलेला नाही. जावली तालुक्यात शशिकांत शिंदे यांच्या विरोधात पक्षातूनच विरोधात अर्ज भरले गेल्याने शिंदे समर्थक आक्रमक झाले आहेत. हे अंर्तगत वाद शमवून राष्ट्रवादीला भाजप व शिवसेना या दोन स्वतंत्र पॅनेलचा मुकाबला करायचा आहे. बऱ्याच प्रकरणात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी बिनविरोध निवडणुका होण्यासाठी केलेली शिष्टाई असफल ठरण्याच्या मार्गावर आहे.

आता हे गुंतागुंतीचे प्रश्न राष्ट्रवादीचे सुप्रीमो खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यात सोडविले जाणार आहे. सकाळी ९ वाजता खासदार शरद पवार यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार, खासदारांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी खासदार शरद पवार हे खुले पणाने चर्चा करणार असून बरीचशी रणनीती याच बैठकीत अंतिम करणार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेच्या सर्वसमावेशक पॅनेलची घोषणा आणि अडचणींच्या जागांवर पर्याय काढणे या मुद्यांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनं करणार आहेत. मागील दोन वर्षात कोरोना काळ, राजकीय दृष्टया राष्ट्रवादीची गत विधानसभा निवडणुकांमध्ये झालेली पडझड या घडामोडी लक्षात घेता करोनाचा संसर्ग कमी होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचा होणारा हा मेळावा अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्था व जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने शरद पवार व अजितदादा पवार यांच्यावर टीका केली होती. या आरोपांना शरद पवार उत्तर देणार का ? हा औत्सुक्याचा विषय आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचाही रोडमॅप अंतिम होणार असल्याने पवारांच्या या दौऱ्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत.


Back to top button
Don`t copy text!