दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘दोन नाईक निंबाळकरांमध्ये फरक आहे. मी आणणारा नाईक निंबाळकर आहे ते घालवणारे नाईक निंबाळकर आहेत. तसाच फरक पवारांमध्ये आहे. अजित पवारांनी आपल्या विकासाराला कधी विरोध केला नाही. आपल्या रेल्वेला मदत केली. माझ्यावर खोट्या केसेस दाखल झाल्या तेव्हा अडचणीच्या काळात माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहीले. शरद पवारांनी आपल्या विकासाला विरोध केला. त्या बैठकींचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. आपलं पाणी त्यांनी नेलं, आपली रेल्वे त्यांनी आडवली, आपले रस्ते त्यांनी थांबवले’’, असे आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ विडणी (ता.फलटण) येथे आयोजित जाहीर सभेत रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले आदींची उपस्थिती होती.
‘‘त्यांनी कारखाना, खरेदी-विक्री संघ, दूध संघ तोट्यात नेला. बँक पतसंस्थेला चालवायला दिली. श्रीमंत संजीवराजे या कर्तृत्त्वशून्य माणसानी या संस्था बंद पाडल्या आणि स्वत:चा उद्योग वाढवला. पवार साहेबांचं ऐकून त्यांनी तालुक्याचं पाणी बारामतीला दिलं, एमआयडीसी बंद पाडली, तासगावकरांचा कारखाना बंद पाडला अशी बंद पाडणारी ती माणसें आहेत. मी तालुक्यात विकासकामासाठी निधी आणत होतो. पण त्यांना आपण सोडून दुसरं कोण चालत नाही, म्हणून माझ्याविरोधात ते सगळे उतरले सोलापूरचा खासदार आणून त्यांनी काय मिळवलं?’’, असा सवालही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी उपस्थित केला.
‘‘कमिन्समध्ये पोर 8-10 तास काम करतायंत आणि त्यांचा निम्मा पगार ही मंडळी खात आहेत. महिन्याला 12 कोट रुपये यांना कमिन्समधून मिळत आहेत. या पैशाच्या जोरावर ते माझ्यासारख्याला 10 वेळा पाडतील. त्यामुळे सत्ता कुणाला द्यायची हे तुम्ही आता ठरवायचं आहे’’, असे सांगून ‘‘श्रीराम कारखान्याच्या बैठकीत गोरगरीब शेतकरी प्रश्न विचारु शकत नाहीत. विश्वासराव भोसलेेंनी प्रश्न विचारला तर स्टेजवरुन त्यांचा पाय काढण्याची भाषा त्यांनी केली. या तालुक्यातल्या सहकारी संस्था वाचवण्यासाठी, शेतकर्याला वाचवण्यासाठी, शेतमालाला मार्केट कमिटीतून चांगला दर मिळवण्यासाठी, खरेदी – विक्री संघ पुन्हा सुरु करण्यासाठी आणि नाईकबोमवाडीची एमआयडीसी होण्यासाठी सचिन पाटील यांची उमेदवारी महत्त्वाची आहे’’, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
‘‘सचिन पाटील निवडून येणार म्हणल्यावर रासपच्या चिन्हावर त्यांनी उमेदवार आयात केला आहे. त्या उमेदवाराचे लोक 15 दिवसांपूर्वी शरद पवारांच्या सभेत तुम्हाला दिसले होते. त्यांना सगळी मदत कोण पुरवत आहे हे लक्षात घ्या. तुम्ही समजूतदार आहात. निवडणकीत सामना घड्याळ विरुद्ध तुतारी असून अशा लेाकांचं डिपॉजीट जप्त करा’’, असा घणाघातही दीगंबर आगवणे यांचा नामोल्लेख टाळून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
‘‘आमले विद्यमान आमदार कर्तव्यशून्य आहेत. ते केवळ आपली नोकरी करतायतं. आमदारांनी केलेली 5 मोठी कामं दाखवावीत मी निवडणूक प्रचारातून बाजूला होतो’’, असे आव्हान देवून ‘‘आपले सचिन पाटील शेतकरी कुटूंबातून आले आहेत. शेातीमध्ये वेगवेगळे संशोधन त्यांनी केले आहे. त्यामुळे अशा शेतकरी कुटूंबातल्या व्यक्तीला आपला आमदार म्हणून तुम्ही निवडून द्या’’, असे आवाहनही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.