दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२३ । अमरावती । राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडाला आज १ वर्ष झाला असून हा दिवस गद्दार दिन, खोके दिवस म्हणून साजरा करावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून आजच्या दिवशी ठिकठिकाणी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्यावरून भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी थेट शरद पवारांवर खोचक टीका केली.
खासदार अनिल बोंडे म्हणाले की, शिवसेनेतून हिंदुत्वाचा विचार घेऊन चाळीस आमदारांनी उठाव केला ते गद्दार नाहीतर स्वाभिमानी आहेत. मात्र, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गद्दार दिन साजरा करत आहे, त्यांनी आज गद्दारदिनाऐवजी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करावा. कारण महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण करून पहिल्यांदा कुणी सरकार स्थापन केलं असेल तर ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आहेत. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाचे शरद पवार हे आदीपुरुष आहेत. त्यामुळे कोण गद्दार आहे त्याचा विचार करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज केक कापून पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करा असं त्यांनी म्हटलं.
शिंदे फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर खोक्यांची प्रतिकृती उभारून पन्नास खोके एकदम ओके म्हणत आज गद्दार दिन साजरा करण्यात आला. मुंबईतही राष्ट्रवादी भवनाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन करत खोके खोके घोषणाबाजी केली.
…तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत – सुप्रिया सुळे
या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. आम्ही गद्दार दिवस साजरा करत आहोत आणि या कारणासाठी आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. ‘महाराष्ट्र कभी झुका है, ना कभी झुकेगा’…’मोडेन पण वाकणार नाही’ जे ‘गद्दार’ असतील त्यांना ‘गद्दार’ म्हणायची ताकद माझ्यात आहे असं सुप्रिया सुळे यांनी सरकारला ठणकावून सांगितले.