शरद पवार अजूनही पॉवर फुल्ल ! @ 81 अभिनंदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ शरद पवार आहेत हे त्यांनी गेल्या वर्षी परस्परविरुद्ध तोंडे असलेल्या, भिन्न विचारधारेच्या तीन राजकीय पक्षांची म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची आघाडी करुन महाराष्ट्राच्या सत्तेची मोट बांधून पुन्हा एकदा सिद्ध केले. हे फक्त शरद पवारच करु शकतात. ही चाणक्यनीती त्यांनी 1978 मध्येही महाराष्ट्रात ‘पुलोद’ स्थापन करुन वापरली होती. पण त्यावेळी ते राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडून यशवंतराव चव्हाणांचे बोट सोडून स्वतंत्र झाले होते (मुक्त नाही). नंतरच्या राजकीय परिस्थितीने ‘पुलोद’ पडले पण ‘किमयागार’ म्हणून पवारांचा लौकीक सुरु झालाच.


महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणातल्या ज्या दोन व्यक्तींना विशेषत्वाने मानतो त्या महनीय व्यक्ती म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व शरद पवार. आज शिवसेना प्रमुख हयात नाहीत आणि शरद पवारांना जेव्हढे महाराष्ट्रात मानले जाते तसा दुसरा कोणी नेता अजूनतरी नाही.
 
दिल्लीच्या राजकारणात जसे यशवंतराव चव्हाण फार पुढे म्हणजे पंतप्रधानपदापर्यंत जाऊ शकले नाहीत तीच गत शरद पवारांची झाली. केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता गेल्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युग सुरु झाले आणि पवारांनी दिल्लीच्या, पर्यायाने राष्ट्रीय राजकारणात तसे अलिप्तच राहणे पसंद केले. सन 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत त्यांनी काँग्रेस व अन्य मित्र पक्षांबरोबर मोट बांधून भाजप – शिवसेना विरुद्ध जीवाचे रान केले. त्यांनी सातारला भर पावसात भिजून केलेल्या भाषणाने महाराष्ट्राचा सारा माहोलच बदलला. जर काँग्रेसने व त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांनी पवार साहेबांच्या बरोबरीने तेव्हढ्याच ताकदीने असा प्रचार केला असता तर पुन्हा राष्ट्रवादी – काँग्रेसचेच सरकार बहुमताने राज्यात आले असते. पण तसे झाले नाही. निवडणूक निकालाअंती बहुमत भाजप – शिवसेनेच्या युतीला मिळाले. पण निकालानंतर तिकडे शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून – रुसून बसल्याने अखेर त्यांची भाजपशी जी युती – दोस्ती होती ती भाजपकडून तुटली. आवर्जून पवारसाहेब हा सर्व खेळ धूर्तपणे पाहत होते. शिवसेनेचे चाणक्य खा.संजय राऊत यांच्यामार्फत खलबते करुन शिवसेना पूर्णपणे भाजप पासून नक्की दूर होईल अशी व्यूहरचना त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांची पितृतुल्य जागा शरद पवारांनी नकळत पण चाणाक्षपणे घेतली आणि ‘बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हीच वेळ आहे’ अशी भावनिक साद घातली. त्यांची ही चाणक्यनीती यशस्वी झाली. अर्थात मध्येच ना.अजितदादा पवार काही तास भाजपकडे जावून औटघटकेचे उपमुख्यमंत्री झाले. पण हेही पवारांच्या चाणक्यनितीनेच घडले असल्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवत असतानाच अजितदादा पवार शरद पवारांच्याच इशार्‍यावर भाजपची साथ सोडून परत आले आणि ‘शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस’ असे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. विशेष म्हणजे यात अजितदादाच परत उपमुख्यमंत्री झाले.

शरद पवारांची ही चाणक्यनीती 1978 नंतर पुन्हा महाराष्ट्रात यशस्वी झाली तरी दिल्लीत मात्र अजूनि महाराष्ट्राच्या ‘चाणक्या’ला यश आले नाही. त्यांनी काँग्रेस सोडण्यास (सोनिया गांधी विदेशी आहेत या कारणावरुन) आणि स्वत:चा पक्ष काढण्यात फार मोठे धाडस केले. पण नियतीने या देशाचा आणि काँग्रेसपक्षाचा इतिहास असा काही घडविला आहे की, जो कोणी नेहरु – गांधी घराण्याला प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहील त्याचा करुण, दारुण राजकीय अंत काही काळाने होतो. हा इतिहास पवारांना माहित नसेल असे नाही. पण तरीही त्यांनी धाडस केले. काही काळ त्यांनाही राजकीय वनवास भोगावा लागला. पण पुन्हा त्यांना काँग्रेसच्या बरोबर देशाच्या सत्तेत सामील व्हावे लागले. कारण सत्ता देशाची असो वा राज्याची, सत्तेच्या बाहेर राहण्याचे त्यांना व त्यांच्या अनुयायांना शक्य नव्हते. त्यामुळे ते केंद्रात काँग्रेसबरोबर आणि महाराष्ट्रातही काँग्रेसबरोबर राहिले. पण महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री (म्हणजे फक्त राष्ट्रवादी पक्षाचा) होऊ शकला नाही. आताही महाराष्ट्रात त्यांच्या चाणक्यनीतीमुळे सरकार स्थापन झाले असले व या सरकारचा रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे असला तरी त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. पुन्हा उपमुख्यमंत्रीपदावरच राष्ट्रवादीला समाधान मानावे लागत आहे. शरद पवार कितीही मोठे चाणाक्ष, लोकप्रिय नेते असले तरी त्यांची राजकीय विश्‍वासार्हता मात्र नेहमीच संशयातीत राहिली आहे. गांधी घराण्याच्या सत्तेला आव्हान देण्याचे धाडस करुनसुद्धा त्यांचे फारसे राजकीय नुकसान झाले नाही कारण ते तडजोडीतून यश खेचून आणतात हा त्यांच्यातल्या ‘चाणक्य’ नीतीचा विजय आहे. परंतू जर त्यांना त्यांचे दिल्लीत राजकीय वर्चस्व वाढवायचे असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांना संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करावे लागेल आणि तसे झाले तरच त्या बळावर ते दिल्लीला हवे तसे नाचवू शकतील. अतिशय प्रभावी डावपेच खेळणे (जवळच्यांनासुद्धा न कळता) ही पवारांची खासियत व राजकीय शक्ती आहे. ती त्यांना आता येत्या 4 वर्षात महाराष्ट्रात वापरावी लागणार आहे.

 
पुढची चाल ?

पवार आता महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व कसे प्रस्थापित होईल, यावर लक्ष केंद्रित करतील असे राजकीय विश्‍लेषकांना वाटते. अतिशय मधुर आणि समयोचित वागण्याने उध्दव ठाकरे यांची भावनिक पोकळी भरुन काढण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच आहे. एका स्वतंत्र राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आणि मोठे नेते असूनसुद्धा त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’वर आणि खा.संजय राऊत यांच्या बंगल्यावर जाण्यात कमीपणा मानला नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते हे करु शकणार नाहीत हेही त्यांना चांगलेच ठाऊक आहे. सत्तेच्या सारीपाटाची सूत्रे आपल्या हातात असूनसुद्धा ते हे करतात त्यामागे निश्‍चितच काही राजकीय सूत्र असणारच. हे सुरु असताना दुसरीकडून उध्दव ठाकरे यांना म्हणजे शिवसेनेला खच्ची करु शकेल असे नवे सत्ताकेंद्र त्यांच्या घरच्याच माणासांमधून उभे करण्याचा प्रयत्न झाला तर त्यात आश्‍चर्य वाटण्याचे (‘राज’) कारण नाही. तसेच भाजपमध्ये खुद्द पंतप्रधान मोदींशीच त्यांचे सख्य असल्यामुळे ते ज्याअर्थी कडवे विरोधक असलेल्या शिवसेनेला जवळ करु शकतात तर भाजपला (किंवा भाजप बंडखोर वाढवूनसुद्धा) भविष्यात कां नाही?

या प्रश्‍नाचे उत्तर आज नाही पण हे होऊच शकणार नाही असेही कोणी धाडसाने म्हणू शकणार नाही. अर्थातच ही खलबत करत असताना त्यांना आपल्या पक्षाचा त्यांच्या नंतरचा उत्तराधिकारी ठरवावा लागेल. काही त्यांचे राजकीय सरदार विखुरले आहेत त्यांना एकत्र करावे लागेल आणि हे सारे करताना ‘फार’ पुढे गेलेल्या अजितदादांना बरोबर घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे हे त्यांना कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. एकूणच आता या 4 वर्षात शरद पवारांना आपली ‘चाणक्य’नीती भक्कम करावी लागणार आहे. भिजल्या पावसात जसे ते खंबीर उभे राहिले व त्यांच्या भक्कम पावलामुळेच पुन्हा राष्ट्रवादीला सत्तेचे पाऊल मिळाले ते अधिक भक्कम करावे लागेल. यासाठी या ‘चाणक्या’ ला 81 व्या वर्षीही उत्तम आरोग्य लाभो व जनतेच्या मनातील ‘पंतप्रधान’ पद किंवा दिल्लीच्या राजकारणातले भक्कम स्थान मिळो या वाढदिवसानिमित्त असंख्य शुभेच्छा !

– रविंद्र बेडकिहाळ,
अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण, जि.सातारा.
मो.9422400321


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!