दैनिक स्थैर्य । दि. २८ मार्च २०२३ । मुंबई । स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींकडून होत असलेल्या अपमानाबाबत शिंदे गट आणि भाजप चांगलेच आक्रमक झाले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा जाहीर निषेध केला आहे. तसेच सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी पाठिंबा दिला आहे.
नवी दिल्लीत विरोधकांच्या झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी हा मुद्दा काँग्रेस नेत्यांसमोर मांडला आहे. सावरकर आणि RSS यांचा संबंध नाही, ते विज्ञानवादी होते. त्यामुळे त्यांना माफीवीर म्हणून हिणवनं योग्य नाही, असे मत शरद पवार यांनी काँग्रेसच्या बैठकीत मांडले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. यानंतर आता शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शरद पवारांनी पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे.
शरद पवारांचा ‘या’ मुद्द्यावर CM एकनाथ शिंदेंना पाठिंबा
सावरकरांच्या मुद्द्यावरून शिंदे साहेबांच्या भूमिकेला शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. स्वातंत्र्यवीरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी घेतलेली भूमिका शरद पवार यांनी दिल्लीमध्ये घेतली. हा विषय निश्चितच अभिमानास्पद असल्याचे मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका अप्रत्यक्षपणे मान्य केली, असेही ते म्हणाले. तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना फक्त झोपताना, उठताना, भाकरी खाताना शिंदे साहेब दिसतात. संजय राऊत यांची मोठी अडचण झाली आहे. गेले २५ वर्षे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध लिहिले. आता त्यांची त्रेधा तिरपीट होत आहे, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला. याशिवाय, उद्धव साहेबांचा आदर ठेवूनच आम्ही शिवसेनेसाठी परिवर्तन केले. आम्ही त्यांच्या शिव्या खाऊ, पण आमची भूमिका त्यांना एक दिवस पटेल, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई आणि राहुल गांधी यांनी केलेले विधान यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तुम्ही माफी मागितली असती तर तुमची खासदारकी वाचली असती. तुम्ही माफी का नाही मागितली? असा सवाल राहुल गांधी यांना विचारण्यात आला होता. त्यावर मी गांधी आहे. गांधी कधीच माफी मागत नाही. मी सावरकर नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधींच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले उद्धव ठाकरे यांनी विरोधाची भूमिका घेतली. आता शरद पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेला विरोध केला.