स्थैर्य, मुंबई, दि.७: ‘राहुल गांधी यांच्याकडे देश
चालवण्यासाठी लागणाऱ्या सातत्याची कमतरता आहे’, असे वक्तव्य शरद पवार यांनी
केले होते. यावर काँग्रेसकडून प्रत्युत्तर आले आहे. काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार
यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो.
पण, राहुल गांधी यांना समजून घेण्यात पवार कमी पडले’, असे मत बाळासाहेब
थोरात यांनी व्यक्त केले आहे.
माध्यमांशी
संवाध साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘राहुल गांधी आमचे नेते आहेत
आणि त्यांचे नेतृत्व पक्षाने स्विकारले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली
देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतोय. त्यांनी जिवनात जे दुःख पाहिले,
त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही सावरत ते नेतृत्व करत आहेत. शरद पवार
यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून
घेण्यात कमी पडले असे वाटते.’
‘…तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणे टाळावे’- यशोमती ठाकूर
राहुल
गांधींवर शरद पवारांनी केलेल्या भाष्यवर काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या
महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्वीटद्वारे निशाना साधला.
“आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत.
काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते
की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर
टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं,” असे ट्वीट
यशोमती ठाकूर यांनी केले आहे.