दैनिक स्थैर्य | दि. ५ सप्टेंबर २०२४ | फलटण |
लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात लोकप्रबोधन आणि जनजागृतीसाठी सुरू केलेला गणेशोत्सव स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन करण्यासाठी उपयोगात आणावा, या उद्देशाने सन १९४९ मध्ये फलटण शहरात सुरू झालेले शंकर मार्केट व्यापारी युवक गणेशोत्सव मंडळ यावर्षी ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.
फलटण शहरातील जुन्या गावठाणातील मध्यवर्ती ठिकाणी पुरातन श्रीराम मंदिर परिसरात कै. बापूराव सहस्त्रबुध्दे, कै. चंदरराव तारळकर, कै. आझादभाई, कै. विठ्ठलराव ढेंबरे, जयसिंगराव ढेंबरे, बाबुराव घाडगे, कै. नारायणराव लाळगे, कै. सावता शिंदे आदींसह शंकर मार्केट परिसरातील युवकांनी मिळून मंडळांची सन १९४९ मध्ये स्थापना केली. यावर्षी मंडळाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.
स्वराज्याचे सुराज्य करण्याचे उद्दिष्ट ठेवून स्थापन झालेल्या या मंडळाने गेल्या ७५ वर्षातील गणेशोत्सव आणि विविध राष्ट्रीय सणांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने लोकशिक्षण आणि लोकप्रबोधनाचे कार्यक्रम राबवून सर्वसामान्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व समजावून त्याच्या रक्षणाबरोबर समाज सुधारणा, समाजहित, समाज शिक्षण याला पाठिंबा देणारे अनेक उपक्रम राबविताना त्यामधून समाज एकसंघ राहील. एक विचाराने देशहिताला प्राधान्य देणारे उपक्रमात सहभागी होईल, असे उपक्रम राबविल्याने आज फलटण व पंचक्रोशीत या उपक्रमांना सर्वसामान्यांची साथ सतत लाभत आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात येणार असून श्रींची मूर्ती ऐतिहासिक शंकर मार्केट वास्तूमध्ये नेहमीप्रमाणे सुशोभीकरण करून विधीवत बसविण्यात येणार आहे. गणेशोत्सव कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन मंडळाच्यावतीने करण्यात येणार आहे.
मंडळाच्या स्थापनेपासून प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात प्रामुख्याने ऐतिहासिक, पौराणिक, समाज प्रबोधनपर देखावे सादर करण्यात मंडळाचा हातखंडा आहे. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन आणि विविध संस्था व मंडळांच्यावतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये मंडळाने आतापर्यंत ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांसाठी व श्रींच्या नाविन्यपूर्ण मूर्तीसाठी अनेक बक्षीसे पटकावली आहेत.
सामाजिक भान ठेवून मंडळाने कारगिल युद्ध, किल्लारी भूकंप यासारख्या संकट प्रसंगी आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत व धान्य, कपडे, वस्तू रूपाने भरीव देणगी फलटण शहरातून जमा करून पाठविली आहे. त्यामध्ये शंकर मार्केट येथील तत्कालीन प्रख्यात माधव आश्रम हॉटेल मंडळाच्यावतीने एक दिवस चालवून झालेला आर्थिक फायदा सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून आपद्ग्रस्तांना मदत म्हणून पाठविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यावेळी माधवाश्रमाचे मालक शरद शिंदे यांनी मंडळाला मोलाची साथ केली.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे जाताना येथे वास्तव्यास असतो, त्यावेळी सोहळ्यातील दिंड्या बाहेर असणार्या लक्षावधी वारकरी स्त्री – पुरुषांसाठी अन्नदान, निवारा, वैद्यकिय सुविधा किंवा अन्य मदतीसाठी फलटणकर नेहमीच पुढे असतात, त्यामध्ये शंकर मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळाने प्रत्येक वर्षी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शहर व परिसरातील नागरिक स्त्री – पुरुष यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, रक्तदान शिबिर आयोजित करुन गरजूंना आवश्यक वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात मंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
गणेशोत्सवाप्रमाणे प्रतिवर्षी गणेश जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, श्रीकृष्ण दहिहंडी आदी सार्वजनिक उपक्रमांद्वारे मंडळाने शहरातील सामाजिक ऐक्य अधिक मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
फलटण शहराला लाभलेला ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपत वृध्दिंगत करण्यासाठी शंकर मार्केट व्यापारी युवक गणेशोत्सव मंडळाने नेहमीच पुढाकार घेतला असल्याने शहरवासीयांनी या मंडळाच्या सर्व उपक्रमांना सतत पाठिंबा दिला आहे.
यावर्षी हे मंडळ ७५ व्या वर्षात पदार्पण करत असल्याने मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी वर्षभर विविध कार्यक्रम उपक्रम राबविण्यासाठी मंडळाचे नियोजन सुरू आहे.