
दैनिक स्थैर्य । 30 मे 2025 । फलटण । फलटण नगरपरिषदेच्यामध्ये अधिकारी थांबत नाहीत, अधिकारी फोन उचलत नाहीत, अश्या विविध कारणांच्यावरुन फलटणनगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर व अनुप शहा यांनी आज फलटण नगरपरिषदेच्या कार्यालयात जात नगरपालकिा धारेवर धरली होती.
विधानसभेच्या निवडणुकिच्या नंतर राज्यात संत्तातर झाल्यानंतर फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सचिन पाटिल विजयी झाले. त्यानंतर अधिकारी वर्ग आमदार सचिन पाटिल यांना विचारात घेतो का ? घेत असल्यास आमदार सचिन पाटिल यामध्ये अश्या अधिकार्यांना पाठीशी घालत आहेत का ? सध्या फलटणमध्ये आमदार हे एकच संविधानिक पद आहे; आपत्ती काळामध्ये सुध्दा आमदार सचिन पाटिल या अधिकार्यांना त्यांना समजेल अश्या भाषेमध्ये सांगत नाहीत की अधिकारी वर्ग आमदार सचिन पाटिल यांना जुमानत नाही, असा सवाल सुध्दा फलटणनगरपरिषदेचे माजी विरोधीपक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या दरम्यान माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
अश्यामध्येच समशेरसिंह नाईक निंबाळकर व अनुप शहा या दोघांनीही नगरपरिषद प्रशासनाचे धिंडवडे काढल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
आपत्ती व्यवस्थापनात सीओंनी नगरपरिषद सोडलीच कशी ? : समशेरसिंह
फलटण नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये बाणगंगा नदीला पुर आल्याने ना भुतो, ना भविष्यती परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे फलटणला झाले असल्याची माहिती दिली आहे, अश्या आपत्तीच्या काळामध्ये फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी मुख्यालय असलेली नगरपरिषद सोडलीच कशी ? असा सवाल सुध्दा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.
निधीचा योग्य विनियोग केला असल्यास एवढे नुकसान झाले नाही : समशेरसिंह
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी दलित निधीचा वापर जर योग्य वेळी विनियोग केला असता आज पुरपरिस्थितीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे; ती परिस्थिती आज निर्माण झाली नसती. मुख्याधिकारी यांनी जर सदरील टेंडर रद्द करत रिटेंडर केले नसते, तर आज ही परिस्थिती कदाचित उद्भवली नसती. मुख्याधिकारी हे स्वतःचा लाभ बघतच त्यांच्या काही पै पाहुण्यांना टेंडर देण्यासाठीत रिटेंडर करित असल्याचा आरोप सुध्दा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.
अनुप शहांकडुन सीओंच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हे आपत्ती काळामध्ये सुध्दा मुख्यालय सोडुन गेले असल्याच्या कारणावरुन फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा यांनी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण केला आहे.