
स्थैर्य,उस्मानाबाद,दि २०: उस्मानाबाद शहरात मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शंभू राजे महानाट्य व चला हवा येऊ द्या फेम कलाकारांचा शो तूर्त स्थगित करण्यात आल्याची घोषणा समितीने केली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समितीने हा निर्णय घेतला आहे.
उस्मानाबाद शहरात मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात महानाट्य शंभूराजे तसेच चला हवा येऊ द्या फेम कलाकारांचा कॉमेडी शो व ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार सांस्कृतिक कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. शिवप्रेमी नागरिकांनी स्वतःची तसेच समाजाची काळजी घ्यावी, सुरक्षित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी यांनी केले आहे. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, प्रकाश जगताप, अग्निवेश शिंदे,राम मुंडे आदी उपस्थित होते.