स्थैर्य, पाटण, दि. 28 : चाफळ येथील रामपेठमधील एका 26 वर्षीय युवकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण चाफळमधील व्यवहार बंद ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चाफळमध्ये येऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या.
दरम्यान, बाधित रुग्णाच्या संपर्कातील 15 लोकांना पाटण येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून मुख्य बाजारपेठेत कमालीची धास्ती वाढली आहे.
संबंधित कोरोना पॉझिटिव्ह युवक हा पुणे येथे कामाला होता. तो मंगळवारी चाफळला आला. त्याला तापाची लक्षणे असल्याने त्याच्यावर बुधवारी चाफळच्या आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. नंतर दुपारी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्या ठिकाणी युवकाचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. गुरुवारी सायंकाळी तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, युवकाच्या कुटुंबातील सदस्यांना तत्काळ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांचा भाजीचा व्यवसाय असल्याने यांचा कोणाकोणाशी संपर्क आला आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे यांच्यासह पथकाने गावात योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सध्या बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, राजेश पवार यांनी तातडीने चाफळ गावास भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांनी घाबरून न जाता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले.