स्थैर्य, सातारा, दि.०७: जिल्हाधिकार्यांनी अत्यावश्यक सेवा वगळून लागू केलेल्या निर्बंधाच्या विरोधात मंगळवारी व्यापारी आक्रमक झाले. भवानी पेठेतील मोती चौकात काही व्यापार्यांनी हे नियम झुगारत दुकाने उघडण्याचा प्रयत्न करताच शाहूपुरी पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. ऐन सणासुदीच्या तोंडावर पुन्हा कडक नियम लागू झाल्याने व्यापार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व्यापार्यांच्या शिष्टमंडळाने सकाळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या मिनी लॉकडाऊनच्या विरोधात आक्षेप नोंदविला.
जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी सातारा जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू करून अत्यावश्यक सेवा वगळून दुकाने ब बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या बाजारपेठेत मिठाई, बेकरी दुग्धालय यांना सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांनी लागू केलेल्या या कठोर नियमाच्या विरोधात कापड व्यावसायिक, इतर दुकानदारांची मंगळवारी सकाळीच तीव्र प्रतिक्रिया आली. मोती चौकात राजपथावरील व्यापार्यांनी एकत्र येऊन या निर्बंधांचा निषेध केला. काही दुकानदारांनी सकाळी नऊ वाजताच चक्क दुकाने उघडून प्रशासनाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकात उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ जाऊन दुकाने बंद केली सातार्यात भाजीमंडई वगळता इतर सर्व व्यापारी वर्तुळात प्रचंड शांतता होती. सातार्यात बंदचा परिणाम म्हणून रोजची वाहतूक सुध्दा तुरळक होती. शाळा मंदिरे बाजारपेठा बंद राहिल्याने राजपथ कर्मवीर पथ राधिका रोडवर सकाळपासूनच सामसूम जाणवत होती.
गुढीपाडवा अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेला असताना कापड व सराफ बाजार छोटे विक्रेते व्यावसायिक यांच्या व्यवसायावर नियमांची संक्रांत आल्याने व्यापारी वर्गात प्रचंड अस्वस्थता आहे. शनिवारी रविवारी लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. कोणी नियमाचे उल्लंघन केल्यास त्याला दंड करा. त्यालाही हरकत नाही मात्र व्यवसाय बंद ठेवल्यास आमचे अर्थार्जन बंद पडणार, आस्थापनांची देखभाल दुरुस्ती कामगारांचे पगार, इतर देणी हे खर्च उत्पन्नच नसल्याने आवाक्याबाहेरच जात आहेत. जिल्हाधिकार्यांनी या नियमांचा फेरविचार करावा, अशी आग्रही मागणी सातारा शहर व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. या संदर्भात व्यापारी संघटनेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे.
सातारा पालिकेच्या पथकाने अंशतः लॉकडाऊन जाहीर असताना मोती चौक ते 501 पाटी या दरम्यान दुकाने सुरू ठेवणार्या सात दुकान मालकांना दंड केला. पालिकेचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि त्यांच्या पथकाने दुपारी दोन वाजेपर्यंत 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला. सदाशिव पेठेतील मोटार स्टँन्डच्या मंडई परिसरातील भाजीच्या दुकानांसह किरकोळ विक्रेत्यांची दुकाने सुध्दा सर्रास सुरू होती. सातार्यात प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावरचा व्यापार सक्तीने बंद असला तरी सेवा रस्ते व इतर गल्लीबोळातील दुकानदारांनी दुकानाचे शटर अर्धवट खाली ओढून आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता.