दैनिक स्थैर्य । दि.१५ एप्रिल २०२२ । सातारा । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या साताऱ्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या भीमाई भूमीत कोरोनानंतर दोन वर्षानंतर मोठय़ा उत्साहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी अलोट गर्दी केली होती. सकाळपासून अभिवादन करण्यासाठी शाहु चौकात झुंबड उडाली होती. ढोलताशांच्या गजरात भीमसैनिकांनी शहरातून भव्य रॅली काढण्यात आल्या. रिपाइंच्यावतीने 131 किलोचा केक कापून ही जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली. तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महिला आघाडीच्यावतीने मोफत सरबत वाटप करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने साताऱ्यात जय्यत तयारी करण्यात आली होती. प्रत्येक चौकाचौकात तरुण मंडळाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेत, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका येथेही अभिवादन करण्यात आले. रात्रीपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात भीमअनुयायांनी गर्दी केली होती. सकाळी गावोगावचे भीमतरुण मंडळाच्यावतीने ज्योत नेण्यात येत होती. तर ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूका येत होत्या. फटाक्यांच्या आतषबाजीत या मिरवणूकांचे स्वागत शाहु चौकात होत होते. आमदार शिवेंद्रराजेंनी यांनी कार्यकर्त्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
१३१ किलोचा केक कापून जयंती साजरी
रिपाइं ए च्यावतीने तयारी करण्यात आली होती. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्यावतीने नियोजन करण्यात आले होते. प्रतापसिंहनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते शाहू चौक अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक व दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. रॅलीचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. यावेळी मदत खंकाळ, सोमनाथ धोत्रे, जयवंत कांबळे, किरण बगाडे, अमित मोरे, सिद्धार्थ संमिदर यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली होती. तसेच राम मदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अल्पोपहार वाटप, महिला आघाडीच्या वतीने लिंबू सरबत वाटप करण्यात आले. याचे नियोजन पूजा बनसोडे व उषा गायकवाड यांनी केले. त्यानंतर प्रतापसिंहनगर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली.