स्थैर्य, नागठाणे, दि. ३१: देशासाठी कर्तव्य बजावत असताना शहिद झालेल्या जवानाच्या पत्नीचे सर्व शासकीय लाभ जबरदस्तीने काढून घेत प्रॉपर्टीतून बेदखल करून तिचा शारीरिक, मानसिक जाचहाट करण्याची तसेच नणंदेच्या मित्राकडून तिचा विनयभंग करण्याची घृणास्पद घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित शहिद जवानाच्या पत्नीने बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोलीस दलात कार्यरत असलेली नणंद, तिचा मित्र, सासू, व सासरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर पीडित महिलेचा पती तीन वर्षांपूर्वी सीमेवर कर्तव्य बजावत असताना शाहिद झाला होता. त्यानंतर शहिद जवानाची पत्नी ही सासू, सासरे व दोन लहान मुलांसह तेथेच राहत होती तर पोलीस दलात कार्यरत असलेली नणंद वरचेवर घरी येत होती. पती शहिद झाल्यानंतर शासनाकडून व इतर सामाजिक संस्थांकडून मदत म्हणून मिळालेल्या रकमा या तिच्याकडून जबरदस्तीने काढून घेण्यात आल्या.
त्यानंतर सासू, सासरे व नणंद यांनी तिला तू पांढर्या पायाची आहेस. चार वर्षसुद्धा संसार केला नाहीस. माझ्या मुलाला टाळले आणि आता आम्हाला टाळायला बसली आहेस ’ असे म्हणून सतत तिचा शाररिक व मानसिक त्रास देऊन तिला सातारा तहसीलदार कार्यालयात जबरदस्तीने नेले. तेथे तिच्याकडून वीरपत्नी म्हणून मिळणारे सर्व लाभ, जमीन, पेन्शन याबाबत हक्कसोडपत्र लिहून घेतले.हक्कसोडपत्र लिहून घेतले तरीही घर सोडून जात नाही हे समजल्यावर दि. 26 जुलै 2020 रोजी पोलीस दलात कार्यरत असलेल्या नणंदेने तिच्या मित्राला प्लान करून घरी बोलावून पीडितेशी शारीरिक संबंध करावे, याहेतूने त्याला मुक्काम करण्यास भाग पाडले. रात्री उशिरा नणंदेच्या मित्राने पीडितेचा विनयभंग केला. याची माहिती तिने सासू, सासरे व नणंद यांना दिली असता याबाबत कोठे बोलायचे नाही नाहीतर तुला घरातून हाकलून देईन अशी धमकी दिली असे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अद्यापही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले नसून या घटनेचा अधिक तपास सपोनि प्रशांत बधे करत आहेत.