शहीद जवान स्मृती सन्मान हा प्रेरणादायी उपक्रम – राधाकृष्ण विखे पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२३ । सोलापूर । दिगंबरराव बागल प्रतिष्ठानने आयोजित केलेला शहीद जवान स्मृती सन्मान उपक्रम प्रेरणादायी व अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केले. करमाळा येथे आयोजित कृषी प्रदर्शन व दिगंबरराव बागल जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पटांगण येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार सर्वश्री रणजीतसिंह मोहिते – पाटील, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे, मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, आदिनाथ कारखान्याच्या संचालक रश्मी बागल, विलासराव घुमरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शहीद जवानांचे वारस विमल वारे, प्रवीण जयहिंदे, गंगुबाई देविदास गात, सीताबाई चौधरी, अनुजा व अरविंद निलंगे, संगिता भारत काबंळे, धनाजी परबत यांचा सन्मान करण्यात आला.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, संपूर्ण देश हेच शहिदांचे कुटुंब आहे. त्यामुळे त्यांच्या वारसाचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. सन्मान झालेल्या सर्व वारसाच्या शासन सदैव पाठीशी आहे. केंद्र सरकारने सर्वात मोठी आर्थिक तरतूद कृषि क्षेत्रासाठी केली आहे. शेती व्यवस्थेमध्ये परिवर्तन होऊन स्थैर्य आले आहे. तीन महिन्यात पाणंद, शिव रस्ते खुले करा. तसेच, मोजणीचे संपूर्ण काम विहित वेळेत पूर्ण करून नकाशे घरपोच करा, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

‌‌यावेळी राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मान्यवरांनी अभिवादन केले. पालकमंत्र्यांनी कृषी महोत्सवातील विविध स्टॉलना भेट देऊन पाहणी केली. तसेच दिगंबरराव बागल यांच्या स्मृती जागृत रहाव्यात, यासाठी उभारण्यात आलेल्या आठवणीतले मामा या कलादालनास भेट देऊन त्यांच्या आठवणीना उजाळा दिला.


Back to top button
Don`t copy text!