शहाजीबापू पाटील यांची समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी सदिच्छा भेट


स्थैर्य, फलटण, दि. १४ नोव्हेंबर : सांगोला मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांनी काल फलटण येथे भाजप नेते तथा नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत आणि नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत समशेरसिंह यांचे नाव आघाडीवर असताना झालेल्या या भेटीमुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शहाजीबापू पाटील यांचे आणि दिवंगत लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे संबंध होते. याच जुन्या कौटुंबिक ऋणातून आणि स्नेहसंबंधातून शहाजीबापू यांनी ही सदिच्छा भेट घेतल्याचे समजते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर ही भेट झाल्याने तिला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. महायुतीमधील घटक पक्ष आणि नागरिकांमधून त्यांच्या नेतृत्वाला पसंती मिळत आहे. अशातच राज्याच्या राजकारणात आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहाजीबापू पाटील यांनी त्यांची भेट घेतल्याने समशेरसिंह यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शहाजीबापू पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा आशीर्वाद आणि पाठिंबा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी आगामी निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गेल्या काही दिवसांपासून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी जनसंपर्क मोहीम राबवली असून, व्यापारी आणि नागरिकांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे. आता शहाजीबापूंच्या भेटीमुळे त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. ही भेट केवळ सदिच्छा होती की त्यामागे काही राजकीय गणितं आहेत, हे आगामी काळात स्पष्ट होईल.


Back to top button
Don`t copy text!