
स्थैर्य, फलटण, दि. १५ सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार फलटण तालुक्यात ‘सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामांचा निपटारा करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
आमदार सचिन पाटील आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
शिवार आणि पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार
या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शिवार रस्ते आणि पाणंद रस्त्यांचे सीमांकन करून त्यांच्या नकाशावर नोंदी घेतल्या जाणार आहेत. यासाठी ९ ते १४ सप्टेंबर दरम्यान सर्व गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान विशेष ग्रामसभा घेऊन या रस्त्यांना मान्यता दिली जाईल. वादग्रस्त रस्त्यांबाबत तहसील स्तरावर ‘रस्ता अदालत’ आयोजित करून सामोपचाराने तोडगा काढला जाणार आहे.
‘सर्वांसाठी घरे’ आणि इतर उपक्रम
अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात, २२ ते ३० सप्टेंबर दरम्यान, ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय जागेचे पट्टे दिले जाणार आहेत. तसेच, पात्र व्यक्तींचे २०० चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण नियमानुसार नियमित केले जाणार आहे. याशिवाय, पोटखराब जमिनी लागवडीखाली आणणे, वारस नोंदी अद्ययावत करणे, ई-पीक पाहणी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी, तसेच भटक्या विमुक्त समाजाला शासकीय दाखले वाटप करणे यांसारखे उपक्रमही राबवले जाणार आहेत.
आमदार सचिन पाटील यांनी या अभियानात शेतकऱ्यांपर्यंत महसूल विभागाच्या सर्व सेवा पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. महसूल विभागासोबत ग्रामविकास, कृषी, भूमी अभिलेख आणि पोलीस यांसारखे विविध विभाग एकत्रितपणे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.