दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
बांधाची भांडणे गावातच मिटवा, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातर्फे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
याबाबत बोलताना सुनील महाडिक म्हणाले की, जसजशी पिढी वाढत जाते, तसतसे जमिनीचे तुकडे वाढत जात आहेत. गटामध्ये अनेक पोटविभागणी झालेली आहे. सातबारावर अनेक नावे चढलेली आहेत. अशावेळी बांधावरून भांडणे ही ठरलेली आहेत आणि ही भांडणे सोडवण्यासाठी महसुली कायदेसुद्धा अपुरे आहेत. भूमी अभिलेख हे गटाची मोजणी करते; परंतु गटाच्या आतमध्ये जे बांध टाकलेले असतात, त्याबाबत ते काही निर्णय देत नाहीत. अनेक लोक फक्त मोठेपणा, राजकारण यामुळे एकमेकांना रस्ता देत नाहीत. आणि रस्ता नसेल तर तुम्ही कितीही विकास करा, तुम्हाला समाधान मिळत नाही. म्हणून प्रत्येकाने सामंजस्याने कुणाबद्दलही आकसबुद्धी न ठेवता रस्ता द्यावा; परंतु रस्ता काढून देण्यासाठी असंख्य प्रकरणे पोलीस स्टेशनला बंदोबस्तासाठी येत असतात आणि केवळ अनेक वर्षांपूर्वीचे भांडण म्हणून रस्ता काढू दिला जात नाही. एकीकडे आम्ही खूप सहिष्णुतेच्या, बंधूभावाच्या गप्पा मारतो; परंतु एक काकरी इकडे-तिकडे सोडत नाही. ही गोष्ट खूप खेदजनक आहे. पोलीस ठाण्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त केसेस याचमुळे दाखल होतात, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.
पोलीस निरीक्षक महाडिक यांनी पुढे सांगितले की, सर्व गावकर्यांना विनंती आहे की, अशी भांडणे सगळीच कायद्याच्या चौकटीत सुटत नाहीत. लोकसहभाग, पंचपद्धत व गावच्या सामापचाराने या गोष्टी सुटू शकतात. अशा गोष्टी झाल्यानंतर खरेतर तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच, तलाठी यांची कमिटी असून त्यांनी बांधावर जाऊन पाहणी करावी व अडवलेले रस्त्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी आणि ती कमिटी जो निर्णय देईल, त्याप्रमाणे दोन्ही वादी-प्रतिवादी यांनी ऐकून सामोपचाराने मार्ग काढावा, म्हणजे पोलीस स्टेशनला डोकेफोड करून यायची वेळ येणार नाही. यापुढे किरकोळ भांडण हे सामोपचाराने मिटवावे, अशी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातर्फे सर्वांना विनंती करण्यात येत आहे.