दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । फलटण । आषाढी वारीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोबत आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या वारकर्यांची मनोभावे सेवा विविध स्तरातून होत असते. यामध्ये मुस्लिम बांधवही आघाडीवर असल्याची प्रचिती पै.पप्पू शेख यांच्या पुढाकारातून फलटण शहरामध्ये पहायला मिळाली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण शहरात दोन दिवसाच्या मुक्कामासाठी आल्यानंतर शुक्रवार पेठ येथील चाँदतारा मस्जीद परिसरात पै.पप्पू शेख यांच्या पुढाकारातून व परिसरातील मुस्लिम बांधवांच्या सहकार्याने हजारो वारकर्यांना मोफत चहा वाटप करण्यात आले. मुस्लिम बांधवांकडून करण्यात आलेल्या आपुलकीच्या पाहुणचाराने वारकरीही भारावून गेले.
दरम्यान, सर्वधर्मसमभावाचा परिचय देत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.