स्थैर्य, पुणे, दि. २७ : पुणे महानगरासह जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या अडचणीच्या काळात कदम कुटुंबियांनी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांना निश्चितपणे दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. कोरोना संकटाच्या कालावधीत सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
कात्रज कोंढवा रोड येथे नगरसेवक प्रकाश कदम यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरसिंद्वारे खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमावेळी आमदार चेतन तुपे, नगरसेवक प्रकाश कदम, माजी नगरसेवक भारती कदम, प्रतिक कदम, डॉ. ओंकार खुने पाटील आदींसह वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री.पाटील म्हणाले, देशासह संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, घराघरांमध्ये कोरोनाचे संकट आहे. ऑक्सिजन निर्मिती क्षमता मर्यादित असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासते आहे. अशा परिस्थितीत कदम कुटुंबियांनी कोविड केअर सेंटर सुरु करून समाजापुढे आदर्श उभा केला आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये 85 बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना चाचण्यांचे प्रमाण राज्यात जास्त आहे. त्यामुळे वेळेत निदान व वेळेत उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. कोरोनाच्या झपाट्याने पसरत असलेल्या संसर्गाला तातडीने रोखण्यासाठी चाचण्यांमध्ये भरीव वाढ करत सर्व यंत्रणांनी रुग्ण संख्येच्या वाढत्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधांसह सज्ज रहावे, लसीकरण वाढवावे, आपण सर्व मिळून एकजुटीने कोरोनाच्या संकटातून निश्चितपणे बाहेर पडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, नगरसेवक प्रकाश कदम व त्यांच्या कुटुंबियांनी पुढाकार घेत सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून कात्रज परिसरातील नागरिकांना निश्चितपणे चांगली सेवा मिळेल. आमदार श्री.तुपे यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाची साथ मिळणे आवश्यक आहे. कोरोनाची लक्षणे जाणवताच तातडीने तपासणी करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.