प्रवचने – नामाचे प्रेम का येत नाही ?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


आज इतकी वर्षे होऊन गेली तरीसुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास, यांच्यासारख्या थोर संतांचे नाव टिकून राहिले आहे. याचे खरे कारण हे की, त्यांचे नामावर अत्यंत प्रेम होते. या सर्व संतांच्या वचनांवर आपण विश्वास ठेवतो. त्यांच्याप्रमाणे नामाचे प्रेम आपल्यालाही यावे असे आपल्याला वाटते. पण ते प्रेम आम्हाला का उत्पन्न होत नाही, याचा विचार आपण करायला पाहिजे. त्या नामाला उपमा देताना, ते अमृतापेक्षाही गोड आहे असे त्यांनी सांगितले. नामाला अमृताची उपमा देताना, त्या अमृताच्या पलीकडे दुसरी गोष्टच नाही असे आपण म्हणतो. मग त्या नामाचे प्रेम आम्हाला का बरे नसावे ? तर त्या नामाच्या आड काही तरी येत असले पाहिजे हे खास. ज्याप्रमाणे आपण तोंडात साखर घातल्यावर आम्हाला जर ती गोड लागली नाही, तर तो दोष साखरेचा नसून आमच्याच तोंडाला चव नाही असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे नामाची गोडी आमच्या अनुभवाला येत नसेल, तर आमच्यामध्येच काही तरी दोष असला पाहिजे खास.

नामाचे प्रेम येण्याला बहुतेक लोक काही ना काही अडचणी सांगतात. कुणाला विचारले, ‘नामाचे प्रेम का येत नाही ?’ तर तो सांगतो, ‘माझे लग्न झाले नाही. ते होऊन प्रपंच, मुलेबाळे, हे सर्व झाल्यावर मला नामाचे प्रेम येईल.’ पण लग्न करून मुलेबाळे असलेल्या किती लोकांना नामाचे प्रेम लागले आहे ? कोणी म्हणतो, ‘पैसा नाही म्हणून प्रपंचाची काळजी वाटते आणि नामाचे प्रेम येत नाही.’ परंतु अगदी भरपूर पैसा असलेल्या किती लक्षाधीशांनी नामाचे प्रेम मिळविले आहे ? कोणी म्हणतो, ‘या प्रपंचात बायकोमुले, आजारपण, शेतीवाडी, यांच्या व्यापामुळे आम्हाला नामाचे प्रेम लागत नाही;’ तर कोणी म्हणतो, ‘प्रपंचात राहून मला आता कंटाळा आला आहे; मी आता संन्यास घेतो, म्हणजे मला नामाचे प्रेम येईल;’ तर कोणी प्रापंचिक दुःखाला कंटाळून अगदी आत्महत्या करायला निघतो. अशा रीतीने, सर्वजण ज्या परिस्थितीत असतात त्या परिस्थितीत नामस्मरणाला अडचणच सांगत असतात. नामाचे प्रेम न यायला खरोखरच परिस्थिती कारणीभूत आहे का, याचा विचार आपण करायला पाहिजे. मला वाटते, नामाचे प्रेम न यायला खरोखर कारण कोणते असेल, तर भगवंत हवा असे आम्हाला मनापासून वाटतच नाही. भगवंत हवा आहे असे वाटणे, हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे. तुम्हाला खरोखरच भगवंत हवा आहे असे वाटू लागले म्हणजे त्या हवेपणातच त्याच्या प्राप्तीचा मार्ग दिसू लागेल.


Back to top button
Don`t copy text!