पुष्कळ वाचले, ऐकले, पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग ? कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केले ? तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही, त्याचे मननच जर केले नाही, तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग ? देह हा अनित्य आहे, असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितले आहे. तरीसुद्धा आम्हांला देहाचे प्रेम सुटत नाही, याला काय करावे ? संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा. देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरविले, पण खरोखर अनुभव काय येतो हे पाहावे. आपण पाहतो ना, की लहानापासून मोठयापर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत, मनुष्याची सारखी धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधानासाठी. लहानाचे मोठे झालो, विद्या झाली, नोकरी मिळाली, पैसा-अडका मिळतो आहे, बायको केली, मुलेबाळे झाली; ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले, त्या त्या करिता प्रयत्न केला. परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का ? देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे; पण म्हणून देहाच्या सुखाकरिताच जन्मभर आटापिटा करायचा हे योग्य नव्हे. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. या देहाचे कौतुक करीत असताना दुसर्याची घरभरणी चालली आहे. त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही. देह गेला की सगळे गेले !
कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे. स्वतंत्रता आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखीच दिसतात; पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वतंत्रता ही पवित्र आहे, तर स्वैरवर्तन हे घाणेरडे आहे. लोकांच्या स्वतंत्रतेविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात. खरे म्हणजे, माणसाला स्वतंत्रता फक्त स्वतःची उन्नती, म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे. इतर बाबतीत, म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत, त्याला बंधनेच असतात, आणि ती आवश्यकच आहेत. देहासंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको, वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच, पण मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे. ऑफिसला जाणार्यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे; घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे; आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा. आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो, त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय.
जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे, तेथेच समाधानाची प्राप्ती होते.