प्रवचने – प्रपंचात ‘राम कर्ता’ ही भावना ठेवावी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


परमात्मा आनंदरूप आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. भगवंताच्या हास्यमुखाचे ध्यान करावे. प्रत्येक गोष्टीत मनुष्य आनंद पाहात असतो. उकाड्यात वारा आला, त्याला वाटते बरे झाले; पाऊस आला की त्याला वाटते, आता गारवा येईल. कोणत्याही तऱ्हेने काय, मनुष्य आनंद साठवू पाहात असतो. मनुष्याला भूक लागेल तेव्हा जर अन्न खाईल तर त्याचे पोट भरेल आणि त्यापासून त्याला आनंद होईल; परंतु त्याने विष खाल्ले तर त्याने आनंद न होता मरण मात्र येईल. तसे आपले होते. आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो, आणि तो बाधक होतो. एखाद्या रोग्याला जर जंत झाले आणि त्याला जर खूप खायला घातले, तर ते शरीराला पोषक न होता, जंतच वाढतात; त्याचप्रमाणे आपण सत्कर्मे करताना पोटात विषयांचे प्रेम ठेवून ती केली, तर त्यामुळे विषयच पोसले जाऊन, त्यांपासून समाधान लाभू शकत नाही. याकरिता कर्तव्यबुद्धीने कर्म करावे, म्हणजे ते बाधक ठरत नाही.

मनुष्य जन्मभर जो धंदा करतो त्याच्याशीच तो तद्रूप होऊन जातो. एखादा वकील घ्या, तो त्याच्या धंद्याशी इतका तद्रूप होतो की मरतेवेळीसुद्धा तो वादच करीत जाईल. नोकरी करणारा नोकरीशी इतका तद्रूप होतो की, स्वप्नात देखील तो स्वतःला नोकर समजूनच राहतो. कर्म कसे करावे, तर त्याच्यातून वेगळे राहून. लग्नाचा सोहळा भोगावा, लाडू खावेत, परंतु ते दुसऱ्याचे आहेत असे समजून. आपल्या मुलीचे किंवा मुलाचे नाहीत असे मानून; नाही तर व्याह्यांची काळजी लागायची, किंवा हुंडा मिळतो की नाही इकडे लक्ष लागायचे. त्यामुळे तापच निर्माण होईल. कर्माशिवाय कोणालाच राहता येत नाही. एखाद्याला शिक्षा द्यायची म्हणून, ‘अगदी हलायचे नाही, पापणी, हात, पाय, काहीही हलवता कामा नये,’ असे सांगितले तर ते जसे त्याला शक्य होणार नाही, तसे काही ना काही तरी कर्म हे होणारच. भगवंतांनी अशी काही सांगड घालून दिली आहे की कर्म केल्याशिवाय गत्यंतरच नाही. परंतु ती कर्मे ‘ राम कर्ता ‘ ही भावना विसरून केली तर बाधक होतात, आणि मरणापर्यंत माणूस पुढल्या जन्माची तयारी करीत राहतो; तेव्हा, देहाने कर्म करतानाही ‘ कर्ता मी नव्हे ‘ हे जाणून कर्म करावे. आपल्याला कर्म केल्याशिवाय करमत नाही. पण आपण फळाची आशा उगीचच करीत असतो. आपण फळाची आशा सोडून कर्म करू लागलो, की ते कर्म करीत असतानाच समाधान प्राप्त होते.

प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे , पण मनात मात्र ‘मी रामाचा आहे’
ही अखंड आठवण ठेवावी, म्हणजेच त्याच्या नामात राहावे.


Back to top button
Don`t copy text!