प्रवचने – अनुसंधानासाठी सतत नामस्मरण करावे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


नामस्मरण हे प्रपंचाकरिता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ति कमी करण्यासाठी आहे. तरी पण त्याने प्रपंच बिघडणार नाही. जे होईल ते आपल्या बऱ्याकरिता आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावे. एक गृहस्थ मला भेटले तेव्हा म्हणाले, ‘मी रिकाम्या वेळात नामस्मरण करतो.’ त्यावर मी म्हटले,”सार्‍या जन्मात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच; त्याला तुम्ही रिकामा वेळ कसा म्हणता ?” पुढे ते म्हणाले, “प्रारब्धाचे भोग काही केल्या टळत नाहीत, ते भोगावेच लागतात, असे सर्व संत सांगतात. हे जर खरे, तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे ?” खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात हे खरे. पण भोग आले की, आपल्या मनाला चैन पडत नाही, तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले की आपले समाधान टिकते. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये, ‘भगवंताच्या इच्छेने घडायचे ते घडते’ असे मानणे, किंवा ‘भगवंत चांगले करील’ असा विश्वास ठेवून वागणे, हेच सोपे जाईल. हे दिसायला साधे दिसले तरी यात फार मोठे मर्म साठविले आहे हे ध्यानात धरा. “भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावे” अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचे अनुसंधान सतत ठेवले पाहिजे. “आहे त्यात समाधान, आणि भगवंताचे अनुसंधान,” एवढीच सदगुरूची आज्ञा असते. दुसर्‍याने आपल्याला दु:ख दिले असता आपले अनुसंधान चुकते ही त्याची नव्हे, आपली चूक आहे.

‘विषय कसा सुटेल ? मन एकाग्र कसे होईल ?’ हे न कळले तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा, म्हणजे अनुसंधानाचा, अभ्यास करावा. एक भगवंताचे अनुसंधान ठेवले की सर्व गुण आपोआपच वाढतील; ते कसे, तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढतात तसे. झाडाच्या मुळाला पाणी घातले की, त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही बरोबर होते. “अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण, माझे अनुसंधान ठेव, म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल,” असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला सुचवीत आहेत. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे, तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. ज्याचे अनुसंधान अखंड टिकले, त्याचे खाणे, पिणे, उठणे, बसणे, वगैरे सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात.

भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करू या.


Back to top button
Don`t copy text!