गुरूने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे, आणि तो करतो ही ही गोष्ट तितकीच सत्य आहे. पण आपण खरोखर सच्छिष्य आहोत की नाही हे पाहावे. देहातीत व्हायला, गुरूआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे ? ‘मी देही नाही’ असे म्हणत राहिलो तर केव्हातरी देहातीत होईन. दुसरा मार्ग म्हणजे ‘भगवंत माझा’ म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो. समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीतिधर्म सांभाळा, आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका. ‘मी जे जे करतो ते ते भगवंताकरिता करतो’ असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे. भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होय. तोच काळ सुखात जातो की जो भगवत्स्मरणात जातो. खरोखर, स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे. भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय, आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय्. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते. विषय अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते; पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. हे करणे अगदीच सोपे नाही; परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे.
भगवंताची भक्ती ही सहजसाध्य आहे. ती अनुसंधानाने साध्य होते. अनुसंधान समजून केले पाहिजे; तिथे अनुभव लवकर येईल. पहार्यावर शिपाई जसा जागृत राहतो, त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील. चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून, अनुसंधान चुकू देऊ नये. ताप आला की तोंड कडू होते, मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही. त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे. त्याप्रमाणे, वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही. त्यासाठी अनुसंधानच पाहिजे. एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, ‘आता मी मोकळा झालो बाबा !’ नंतर चार दिवस तो मजेत मुंबईत हिंडला. त्याप्रमाणे, आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे, आणि मग मजेने संसार करावा; आपल्याला अगदी आनंदच मिळेल. उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो, त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे; त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते, याला भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे म्हणतात.