संसारातील सार । आपला करा रघुवीर ॥
कलि अत्यंत मातला । नीतिकर्तव्याचा विसर पडला ॥
अनाचार होतसे फार । आता नाही रामावाचून दुजा ठाव ॥
चोराने घरफोड केले । मग जागृतीचे कारण नाही उरले ॥
म्हणून असावी सावधान वृत्ति । अखंड राखावी भगवंताची स्मृति ॥
भगवंतासी अनन्य होता । दु:खाची नाही तेथे वार्ता ॥
अभिमानवृत्ति सोडावी बरी । त्यास घडे रामसेवा खरी ॥
सरे मीपणाची उरी । ब्रह्मरूप दिसे चराचरी ॥
म्हणून ज्याने जन्माला घातले । ज्याने आजवर रक्षण केले ।
तो माझा धनी हे ठेवून चित्ती । भावे भजावा रघुपति ॥
रामाचे व्हावे आपण । राम जोडावा आपण ॥
हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण ॥
म्हणून रामाविण न मानी कोणी त्राता । धन्य त्याची माता पिता ॥
प्रपंच तसा परमात्म्यावाचून । हे जसे अलंकार सौभाग्यावाचून ॥
अलंकार सर्व घातले । पण सौभाग्यतिलक न लावले ॥
तैसे रामाविण राहणे आहे खरे ॥
ऐहिक आणि पारमार्थिक । न जाणावे एकाहून एक परते ॥
ऐहिक आणि पारमार्थिक सुख । रामावाचून नाही देख ॥
म्हणून शुध्द असावे आचरण । तसेच असावे अंत:करण ॥
त्यात भगवंताचे स्मरण । हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥
रामचरणावर ठेवावा विश्वास । हेच परमार्थाचे भांडवल खास ॥
ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण । हीच परमार्थाची खरी शिकवण ॥
माझे हित भगवंताचे हाती । हीच ठेवावी मनाची प्रवृत्ति ॥
राम कर्ता ही असावी भावना । तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा ॥
भाव ठेवावा रामापायी । पण व्यवहार चुकू न देई ॥
परमात्म्याचे राखणे अनुसंधान । हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण ॥
बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगति । चित्ती असावा एक रघुपति ॥
प्रयत्न करणे आपल्या हाती । यश देणे भगवंताचे हाती ॥
प्रयत्नाला न पाहावे पुढे मागे । परि परमात्मा उभा आहे मागे । ही ठेवावी जाणीव मनामध्ये ॥
प्रपंचात दक्षतेने वागत जावे । धीर सोडू नये । भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे ॥
सर्व कामधंदा घरी करी । पण चित्त लेकरांवरी ।
ऐसे जैसे करी जननी । जाण तैसे वागावे आपण ॥
काया गुंतवावी प्रपंचात । मन असावे रघुनाथात ॥
नीतिधर्माचे आचरण । पवित्र असावे अंत:करण ।
त्यात कर्तव्याची जोड पूर्ण । त्या सर्वात राखता आले अनुसंधान । तर याविण दुजा परमार्थ नाही जाण ॥
व्यवहार उत्तम प्रकारचा केला । पण परमात्मा विसरला । तो व्यवहार दु:खच देता झाला ॥
असावी सावधानवृत्ति । अखंड राखावी भगवंताची स्मृति ॥