प्रवचने – मला जनप्रियत्व आवडते


इथून जाणार्‍या मंडळींना निरोप देताना मला खरोखरच फार वाईट वाटते. पुन्हा आपली भेट होईल की नाही ते काही सांगता येत नाही. तुम्ही सर्वांनी एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागा. प्रेमाने जग जिंकता येते. तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका. मला जनप्रियत्व फार आवडते. कारण जो लोकांना आवडतो, तोच भगवंताला आवडतो. जो निःस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळयांसाठी करणे, हे भगवंताला आवडते. आपण आपल्यापुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असे पाहावे. प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे. असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखेच वागले पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोलले पाहिजे असे नाही. प्रेम करायला कशाचीही जरूरी लागत नाही; पैसा तर बिलकूल लागत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जगात कुणी कधी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली आहे. अशा गरिबीमध्ये राहूनही माझे अनुसंधान टिकले, मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत असावी ? मी जर काही केले असेल तर मी कधीही कुणाचे अंतःकरण दुखवले नाही. तेवढे तुम्ही सांभाळा. जो जो कोणी मला भेटला, तो तो मी आपलाच मानला. मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळलो; त्यामुळे त्याचे सुखदुःख मला कधी बाधले नाही. नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी पुन्हा जन्मास आलो. मला तुम्ही सगळे रामरूप दिसत आहात. मला जे सांगायचे असेल ते मारूतीरायाला सांगावे म्हणजे ते मला कळते. माझा मनुष्य कुठेही असला तरी तो माझ्याकडेच येणार. मला दुश्चित्तपणा अगदी आवडत नाही. ज्यांनी माझी निंदा केली त्यांना तर मी कोण हे कळले नाहीच; पण ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना मी कोण आहे हे त्याहून कळले नाही. प्रत्येकाला वाटते की आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे, मी मात्र वागायचा तसाच वागेन; हे कसे शक्य आहे ? नाम घेतल्याने आपले सर्व अवगुण आपल्यालाच कळून येतील याची खात्री बाळगा, आणि अंतःकरणपूर्वक नाम घ्या.

एक भगवंताचे नाम घट्ट धरावे, त्यामध्ये अती उत्कटता ठेवून एकतानता करावी, आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. ‘मी नाम घेतो’ हे देखील विसरून जावे. हाच खरा परमार्थ होय. नामामध्ये एकतानता होण्यासाठी भगवंताच्या साक्षित्वाने वागा; हवे-नकोपण टाकून द्या; राम कर्ता ही भावना ठेवा; विषय मालकीने भोगा; आपला गुण भगवंताकडे लावा; लहान मूल होऊन देवाकडे जा; रामाला आपले सुखदुःख सांगा; देहभोगाला कंटाळू नका; काळजी ‘घ्या’ पण काळजी ‘करू’ नका, आणि निर्भय बना, आणि अशा रीतीने जिवंतपणी आपले मरण पहा.

जिथे नाम आहे तिथे मी आहे म्हणून खचित समजा.


Back to top button
Don`t copy text!