प्रवचने – प्रपंचात स्त्रीने कसे वागावे ?


पतिसेवा हाच आपला धर्म । प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म ।

अंतरी समाधान हेच आपले साधन ॥

सर्वांनी राहावे सुखी । रामनाम नित्य घ्यावे मुखी ॥

सर्व सुखाचा लाभ । घरबसल्या मिळतो देव ॥

कर्तव्यी असावे तत्पर । मुखी नाम निरंतर ॥

देहाने करावी सेवा । याहून दुजा लाभाचा नाही ठेवा ॥

परमात्म्याने जे जे दिले । ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले ॥

त्या लोभात न गुंतवावे चित्त । हाच परमार्थ सत्य ॥

नसावे कशाचे ज्ञान । वाटावे सदा घ्यावे रामनाम ।

प्रपंची राहावे समाधान । हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण ॥

पतिव्रता साध्वी थोर थोर । त्यांचे करावे स्मरण । जे करील पुण्यवान ॥

न बोलावी पतीस दुरूत्तरे । समाधान राखोनि अंतरे । जे सज्जनांस आवडेल खरे ॥

पतीपरते न मानावे दुजे दैवत । घरात राखावे नेहमी समाधान ॥

तुमच्या पतिसारख्यांची संगति । हीच भाग्याची खरी प्राप्ति ॥

त्यांच्या आज्ञेने वागावे । त्यांच्या सुखात आपले सुख पाहावे ॥

राम धरिता चित्ती । प्रपंचाची काळजी त्याचे हाती ॥

प्रपंची असावे खबरदार । परी लोभात न गुंतावे अंतर ।

धन संग्रही राखावे । सर्वच खर्चून न टाकावे ॥

ही प्रपंचाची रीत । सर्व जगात आहे चालत ॥

जगाची रीत लोभात असणे । हे मात्र आपणास न आवडावे ॥

देहाने करावी पतिसेवा । ध्यानी धरावा रामराया ।

त्याचा संसार उत्तम झाला । हाच आशीर्वाद माझा भला ॥

प्रपंचाची संगति । काळजीची उत्पत्ति ।

तेथे धरिता नामाची संगति । काळजी विरहित आनंद देई ॥

मुलीच्या लग्नाची काळजी करू नये । प्रयत्‍नाला सोडू नये ।

प्रयत्‍नाअंती परमेश्वर । हे सज्जनांचे बोल । मनी ठसवावे खोल ॥

आरंभी ज्याने स्मरला राम । त्यालाच प्रयत्‍नाअंती राम ।

हा ठेवावा विश्वास । सुखे साधावे संसारास ॥

मिष्ट भाषण वरिवरी । विष आहे अंतरी । असल्याची संगत नसावी बरी ॥

मी तुम्हास सांगतो हित । दृश्यात न ठेवावे चित्त ॥

राम सेवेकरता प्राण । म्हणून करणे आहे जतन ॥

मान अपमान जगतात । ते मूळ कारण झाले घातास ॥

कोणतेही काम करीत असता । राखावी मनाची शांतता ।

अगदी व्यवहारबुद्धीने कामे करावी सर्वथा ॥

आप्त‌इष्ट सखेसज्जन । यांचे राखावे समाधान । परी न व्हावे त्यांचे अधीन ॥

सर्वांशी राहावे प्रेमाने । चित्त दुश्चित न व्हावे कशाने ॥

आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥

अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे । त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ॥

रामावर ठेवावा विश्वास । सुखाने करावा संसार ॥


Back to top button
Don`t copy text!