प्रवचने – भगवंत आणि मी वेगळे नाहीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले, तरी त्याच्याखाली पाणीच असते. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया. तिला आपण खरे मानतो. मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते. आपण मायेच्या पाठीमागे जातो, पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस ‘सोऽहं’ म्हणत होता, नंतर ‘कोऽहं’ म्हणू लागला आणि शेवटी ‘देहच मी’ म्हणू लागला ! वास्तविक, सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत, त्याप्रमाणे ‘भगवंत’ आणि ‘मी’ वेगळे नाहीत.

सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते, म्हणजे परमात्मस्वरूप होय. सच्चिदानंदस्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे यालाच अनुसंधान म्हणतात. भगवंतावाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. ‘मला कळत नाही’ असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे; आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय. ‘जे जे घडते त्याचा कर्ता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे’ असे वाटणे, यालाच निष्काम कर्म म्हणतात; आणि ‘आले तर भोगले, गेले तर सोडले’, हे सहजकर्म होय. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय; आणि ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म असे म्हणतात. ‘अमुकच फळ मला मिळावे’ ही वृत्ती सोडणे, याचे नाव निरासक्ति होय. विषयांची विरक्ति झाली की त्याला ज्ञान झाले असे म्हणतात. थोडक्यात म्हणजे, जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान, आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे. कर्ममार्ग, उपासनामार्ग, नवविधाभक्ति, इत्यादि सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन, असे माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे मुलीला नवरा गाठून देणे, त्याप्रमाणे भगवंताची भेट होणे हे मुख्य होय. आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या, स्वरूपदर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपभोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होते, आणि म्हणूनच सर्व साधनांचे सार भगवंताचे नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि भगवंताशी एकरूप व्हावे. आपण प्रयत्‍न करीत असताना, भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा, आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा.

आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो, तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्‍न करा.


Back to top button
Don`t copy text!