ज्येष्ठ लेखिका स्व. सुलेखा शिंदे यांना ‘साहित्य संवाद’ची आदरांजली!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२४ | फलटण |
फलटण येथील संवेदनशील मनाच्या, साहित्यातून स्वतःची ओळख निर्माण करणार्‍या, वात्सल्यमूर्ती, प्रेमाचा सागर, आभाळाची माया असणार्‍या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दिलखुलास आयुष्यभर साहित्य व सामाजिक चळवळ करणार्‍या लेखिका स्व. सुलेखा शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, वनविभाग फलटण व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक संवाद फलटण कार्यक्रमाच्या वतीने नाना नानी पार्क, फलटण येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे अध्यक्ष रविंद्र बेडकीहाळ, संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, माजी प्राचार्य रविंद्र येवले, प्रा. विक्रम आपटे, प्रा. सुधीर इंगळे, प्रा. डॉ. अशोक शिंदे, रानकवी राहुल निकम, कवयित्री आशा दळवी, महादेव गुंजवटे, बाळकृष्ण कांबळे, अ‍ॅड. रोहिणी भंडलकर, अ‍ॅड. आकाश आढाव, श्रेयस कांबळे, अलका बेडकिहाळ, विकास शिंदे यांनी स्व. सुलेखा शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करून आठवणी जागवल्या.

त्यांचा साहित्य प्रवास तसेच लेखकाचे घर पेलताना त्यांना करावी लागणारी कसरत, साखर शाळेच्या पहिल्या शिक्षिका तसेच प्रौढ साक्षरता यासाठी त्यांनी दिलेले अविस्मरणीय योगदान, पैशापेक्षा माणसे जपली व माणसांची साखळी निर्माण केली. साहित्यात चिंतन असणार्‍या, नवसाहित्यिकांना त्या मार्गदर्शक व प्रेरणास्रोत होत्या. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मातृत्वाचा वसा घेतलेल्या त्या आगळ्यावेगळ्या माता, लेखिका व वात्सल्याचा ठेवा होत्या. साहित्यिक संवादमध्ये त्या भरभरून बोलायच्या, जाणून घ्यायच्या, चर्चा करायच्या, मार्गदर्शन करायच्या, त्यामुळे त्या कायम स्मरणात राहतील.

त्यांचे स्मरणार्थ त्यांनी लिहिलेली कादंबरी व नवकवींच्या कवितांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह काढण्याचे ठरले. प्रकाशनासाठी संयोजक ताराचंद्र आवळे व महादेव गुंजवटे यांनी जबाबदारी घेतली, तर ‘मी सुलेखा बोलतेय’ हे पुस्तक ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांनी लिहिण्याचे अभिवचन दिले. हिच खरी आदरांजली ठरणार आहे.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, मोहनराव फुले, अर्चना गुंजवटे, अ‍ॅड. प्रकाश शिंदे, विनायक ननावरे, सुरेश भगत, मुकुंद मोरे, दामिनी ठिगळे, अस्मिता खोपडे, सचिन जाधव, हरिराम पवार, राजेश पवार तसेच शिंदे कुटुंबियांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!