दैनिक स्थैर्य । दि. ०६ मार्च २०२२ । मुंबई । मराठी पत्रकारितेत क्रीडा पत्रकाराला आणि क्रीडा पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वि. वि. करमरकर यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राचा मार्गदर्शक हरपला आहे. लेखक, समीक्षक, संपादक, समालोचक अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी क्रीडा क्षेत्राची सेवा केली, अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “ वि. वि. करमरकर यांनी लोकांमध्ये खेळाविषयी प्रेम निर्माण व्हावे यादृष्टीने विविध उपक्रम राबविले. खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या प्रेरणेनेच मराठी दैनिकांत क्रीडा पान सुरू झाले. खेळाचे प्रचंड ज्ञान आणि त्यावर नेमक्या शब्दांत भाष्य करण्याची हातोटी यामुळे लोक एखादा सामना पूर्ण बघितल्यानंतरही करमरकर यांनी त्याविषयी काय लिहिले आहे, यासाठी वर्तमानपत्राची वाट बघायचे. त्यांच्या निधनाने एक नवा प्रवाह सुरू करणारा पत्रकार आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर त्यांना देवो, हीच प्रार्थना. ”