ज्येष्ठ पत्रकार अशोक खांबेकर यांचे कोरोनामुळे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.26 : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे ज्येष्ठ सदस्य, कोपरगाव तालुका पत्रकार संघाचे सरचिटणीस, शिर्डी येथील साई संस्थानचे माजी विश्‍वस्त तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक भिमाशंकर खांबेकर (वय 65) यांचे दि.25 रोजी नाशिक येथे कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी मीनल खांबेकर, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

अशोक खांबेकर हे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री ना.अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणूनही सर्वत्र परिचित होते. त्यांना राष्ट्रीय काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून वडिलोपार्जित वारसा होता. सामाजिक व राजकीय माध्यमातून केलेल्या कार्याच्या जोरावर पत्नी मीनल खांबेकर यांना दोनदा कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष बनविण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यपातळीवरील पत्रकार संघटनेबरोबरच इतरही राज्य व जिल्हा पातळीवरील पत्रकार संघटनांच्या माध्यमातून नगरजिल्ह्यात सुरुवातीपासून अशोक खांबेकर पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत होते. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था पी.टी.आय. मध्येही त्यांनी प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे सेवा बजावली. शिर्डी येथील साई सेवा संस्थानचे विश्‍वस्त म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.

अशोक खांबेकर यांना सन 1994 साली पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने नाशिक विभागातून राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. तेव्हापासून खांबेकर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे सक्रीय सदस्य झाले. त्यांनी संस्थेला व बाळशास्त्री जांभेकर स्मारकास वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या जाण्याने पत्रकारांच्या संघटनात्मक कार्यातील सक्रीय कार्यकर्ता पत्रकार बांधवांनी गमावला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष धनंजय उर्फ बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी खांबेकर यांना आदरांजली वाहिली.


Back to top button
Don`t copy text!