दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । गुहागर । आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते तसेच बौद्धजन सहकारी संघाचे माजी चिटणीस, शाखा क्र. ३२ गाव वेळंब या गावचे माजी सरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार मारुती भिकाजी जाधव यांचे अल्पशा आजाराने जे.जे. रुग्णालयात नुकतेच दुःखद निधन झाले.
दिवंगत मारुती भिकाजी जाधव हे धडाकेबाज व धडाडीचे कार्यकर्ता व पत्रकार म्हणून सर्वज्ञात होते, आपल्या व्यक्तिमत्व व कार्याच्या जोरावर त्यांनी जनमानसात आपला ठसा उमटला होता, ते मनमिळाऊ, सर्वसमावेशक स्वभावाचे होते, समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्या अचानक जाण्याने समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगी, दोन मुले, दोन सूना व नातवंडे असा परिवार आहे.
दिवंगत मारुती भिकाजी जाधव यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळगाव वेळंब या ठिकाणी करण्यात आला असून त्यांच्या अंत्ययात्रेला बौद्धजन सहकारी संघ, संलग्न सर्व शाखा त्यांचे पदाधिकारी, सभासद व समाजातील विविध स्तरातील संघटनांचे मान्यवर कार्यकर्ते व जनसमुदाय मोठया संख्येने सहभागी झाले होते त्यावेळी बौद्धजन सहकारी संघ मुंबई व गाव शाखा व संलग्न सर्व शाखांच्या वतीने त्याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच त्यांच्या परिवाराच्या दुःखात बौद्धजन सहकारी संघ सहभागी आहे असे प्रतिपादन मुंबई व गाव शाखेच्या वतीने करण्यात आले.
दिवंगत मारुती भिकाजी जाधव यांचा पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम रविवार दि. ८ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता त्यांच्या वेळंब या गावी गाव शाखेच्या अधिपत्याखाली करण्याचे ठरविले आहे, तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगतांस श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती जाधव कुटुंबिय तसेच संजय तांबे व दीपक मोहिते यांनी मुंबई व गाव शाखेच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात केली आहे.