
स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑगस्ट : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयातर्फे ‘दर्जेदार अॅव्होकॅडो उत्पादन: संधी व आव्हाने’ या विषयावर एक दिवसीय पीक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र गुरुवार, दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुलातील सांस्कृतिक सभागृहात होणार आहे.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असणार आहेत. तर, श्लोकाज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक गणेश बाबर हे प्रमुख वक्ते म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
अॅव्होकॅडो या विदेशी फळपिकाच्या लागवडीतील संधी आणि आव्हाने यावर या चर्चासत्रात सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. फलटण आणि परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.