श्री दत्त इंडिया कारखान्यावर उसाच्या दुसर्‍या हप्त्यासाठी स्वाभिमानीचे आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
उसाच्या २०२२-२३ च्या हंगामातील गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी आज श्री दत्त इंडिया कारखान्यासमोर आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कारखाना प्रशासनाला आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.

कारखाना प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२२-२३ च्या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाचे अंतिम बिल कारखान्याने प्रति टन ३,४११ रूपये प्रमाणे शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये दसरा संपेपर्यंत जमा करावे. तसेच आपल्या कारखान्याचा वजनकाटा त्वरित ऑनलाईन करावा व शेतकर्‍यांची दिवाळी गोड करावी.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, फलटण तालुयातील शेतकरी वर्षानुवर्षे इतर शेजारील तालुयातील कारखान्यांच्या तुलनेत कमी ऊस दर घेत आहे. त्यामुळे शेतकर्‍याचा प्रपंच मेटाकुटीला आला आहे. यावर्षी तर पाऊस न झाल्यामुळे अनेक अडचणी त्याच्यापुढे आल्या आहेत. त्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दत्त इंडिया शुगर कारखान्याने माळेगाव कारखान्याइतका दर उसाला द्यावा, अन्यथा दसर्‍यानंतर माजी खासदार राजू शेट्टी हे जो आंदोलनाचा आदेश देतील, त्याप्रमाणे आपल्या कारखान्यावर आंदोलन केले जाईल, त्याची संपूर्ण जबाबदारी कारखाना व प्रशासनावर राहील, असा इशारा देण्यात आला आहे. कारखान्याने शेतकर्‍यांच्या मागण्यांची गंभीर दखल घेऊन गेल्या वर्षीचे थकित बिल द्यावे.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र घाडगे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, अध्यक्ष युवा आघाडी व राज्य प्रवता प्रमोद गाडे, पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, पक्ष उपाध्यक्ष शकील मणेर, सोमंथळी शाखाध्यक्ष बाळासाहेब शिपकुले, प्रल्हाद अहिवळे, राजेंद्र भोसले, किरण भोसले, अजित भोसले, निलेश भोसले, सचिन रणवरे (जिंती), मनोज वारे (खामगाव), ज्ञानेश्वर संपतवर (पिंपळवाडी), शशिकांत नाळे (विडणी), विश्वास यादव (साखरवाडी), गणेश भोसले, तानाजी भोसले व नवनाथ भोसले (होळ) यांच्यासह शेकडो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!