दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । सातारा । स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित स्वयंसहाय्यता गटांना विविध बँकामार्फत कर्ज वितरण करण्यात येत असून बँक कर्ज प्राप्त स्वयंसहाय्यता गटांनी बँक कर्जाचा विनियोग उद्योगवृद्धीसाठी करून महिलांनी उद्योजक व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.
जिल्हा परिषद सातारा येथील छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये आयोजित भव्य बँक कर्ज वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, गट विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक-स्वाती मोरे, मनोज राजे, सुरज पवार, व उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापक सुचित्रा गायकवाड व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी व संबंधित बँकेचे जिल्हा व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, सातारा यांच्यावतीने जिल्हा परिषद सातारा येथील छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये स्वयंसहाय्यता गटांना भव्य बँक कर्ज वितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये विविध बँकामार्फत 91 स्वयंसहाय्यता गटांना रु. 1.42 कोटी च्या बँक कर्जाचे वितरण करण्यात आले. या बँक कर्ज वितरण मेळाव्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांनी प्राप्त बँक कर्जाचा विनियोग योग्य कारणासाठी करून त्याची परतफेड नियमितपणे करण्याबाबत तसेच स्वयंसहाय्यता गटांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले. तसेच त्यांनी स्वयंसहाय्यता गटांनी “एक गाव एक उत्पादन” विकसित करण्याबाबत आवाहन केले. गट विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी स्वयंसहाय्यता समूहातील महिलांशी संवाद साधताना महिलांनी कर्ज घेतलेल्या रक्कमेतून वैयक्तिक तसेच सामुहिक व्यवसाय चालू करावा, आणि त्यातून स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी.
या प्रसंगी सन 2022-23 चा प्रथम तिमाहीमध्ये सातारा तालुक्यामध्ये उत्कृष्ट कामकाज केल्याबाबत बँक ऑफ इंडिया, शाखा वडूथ, ता. सातारा, बँक ऑफ महाराष्ट्र, परळी शाखा व HDFC, धनगरवाडी शाखा यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँक सखी, श्रीमती रुबिना मुजावर, श्रीमती अनुराधा वाटांबळे व श्रीमती शीतल निकम यांनासुद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.